गणेशोत्सव साजरा करताना मंडळांनी कडेकरांची शांततेची परंपरा कायम राखावी
डिवायएसपी धाराशिवकर; कड्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न
-------------
राजेंद्र जैन / कडा
-------------
गणेशोत्सव साजरा करताना कडेकरांची शांततेची परंपरा कायम ठेवून इतर समाजाच्या भावना दुखावणार नाहीत. याची दक्षता घेऊन गणेश मंडळांनी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करुन शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी कड्यात गणेश मंडळांची शांतता कमिटीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस, पोउपनि अजित चाटे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना धाराशिवकर म्हणाले की, सध्या दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळून साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करुन या गावाची शांततेची परंपरा कायम राखावी. इतर समाजाच्या धार्मिक समाजाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची मंडळानी दक्षता घेऊन मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे. गणेशोत्सवाचे पावित्र्य राखून हा उत्सव शांततेत साजरा करावा. तसेच डाॅल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्याचा वापर करुन मिरवणूक मार्गात अडथळा येणार नाही. याची काळजी घ्यावी. तसेच विधुत अपघात टाळण्यासाठी देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेबाबत मंडळानी अधिकृत वीजजोडणी करुन घ्यावी. सोशल मिडियावरुन आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्यास पोलिस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे धाराशिवकर यांनी सांगितले. तर पोलिस निरिक्षक संतोष खेतमाळस म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करताना कायद्याच्या नियमांचे पालन करुन मंडळांनी शांततेत उत्सव साजरा करावा. परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज करुन पोलिस ठाण्यातून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. गणेश मुर्तीची स्थापना करताना पावित्र्य राखावे. शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणारे मंडळ अथवा व्यक्तीची पोलिसांकडून गय केली जाणार नाही. सोशल मिडियाचा वापर जबाबदारीने करावा. अनावश्यक खर्च टाळून सामाजिक, प्रबोधनपर उपक्रम राबवावेत. कार्यक्रमाच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळावी. काही संशयीत वस्तू अथवा व्यक्ती आढळून आल्यास त्वरित पोलिसांना कळवावे. मिरवणूकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा. असे पोनि खेतमाळस यांनी सांगीतले. याप्रसंगी आभार व्यक्त करताना पोउपनि अजित चाटे म्हणाले गणेशोत्सवाच्या कालावधीत सोशल मिडियावर पौलिसांची करडी नजर राहणार असून, आक्षेपार्ह पोष्ट व मेसेज, तसेच लाईक करणा-यांवरही कारवाई होईल. त्यामुळे गणेश मंडळांनी काळजी घेऊन शांततेत उत्सव साजरा करण्याचे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी कडा येथील मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected