राज्यस्तरीय जलयोद्धा पुरस्कार प्रा.डॉ. राम बोडखे यांना जाहीर

राज्यस्तरीय जलयोद्धा पुरस्कार प्रा.डॉ. राम बोडखे यांना जाहीर

           


        युवा मित्र संस्थेमार्फत राज्य स्तरीय जलयोद्धा दुतीय पुरस्कार प्रा. डॉ. रामकृष्ण बोडखे आनंदवाडी सराटे वडगाव ता. आष्टी जि. बीड यांना सन्मानपत्र ,सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम 50 हजार रुपये मिळणार आहे शनिवार दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता सिन्नरघोटी महामार्गावरील लोणारवाडी येथील संस्थेच्या आवारात या पुरस्काराचे वितरण संस्थेचे कार्यकारी संचालिका मनीषा पोटे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा, शेती आणि पाणी विशेषतज्ञ विजय बोराडे ,ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे.

     वीस वर्षापासून पाण्यावरील व समाजसेवेचे काम केल्यामुळे, आज पर्यंत दहा पुरस्कार तसेच 65 लक्ष रुपयाचे बक्षीस गावाला मिळवून देता आले .

       समाजात प्रत्येक व्यक्तीने जन्माला आल्यानंतर समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो.समाजाचे आपल्यावर ऋण असते.हेच समाजाचे ऋण प्रत्येकाने निस्वार्थपणे सेवा करून फेडलेच पाहिजे.मलाही माझे आनंदवाडी सराटे वडगाव जलसमृद्ध करावे वाटले मी त्यासाठी 20 वर्षापासून प्रयत्न करत होतो.हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सन2022 हे वर्ष लागले.माझी ही दोन्ही गावे जलसमृद्ध होऊन आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करू लागले याच वाटचालीची थोडक्यात यशोगाथा खाली सांगत आहे.

                     मराठवाड्यातील आनंदवाडी ता.आष्टी या छोट्याशा गावात 1970 ला शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला.शिक्षण पूर्ण झाल्यावर कडा येथील आनंदराव धोंडे कॉलेजमध्ये इतिहास विषयाचा प्राध्यापक म्हणून 1995 पासून सेवेत रुजू झालो.संत गाडगेबाबा महात्मा गांधी व अण्णा हजारे हे माझे आदर्श होते त्यामुळे माझ्याच गावात युवकांना एकत्र करून ओढ्यावर वनराई बंधारे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण अशी कामे करत होतो.

खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा|| झटू सर्व भावे करू स्वर्गगावा||

                दहा वर्षे एनएसएस चा कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करत असताना समाज सेवा करण्याची मला सुवर्णसंधी मिळाली.राष्ट्रीय सेवा योजनेच्या गावातील दहा दिवसीय शिबिरामुळे व एक दिवसीय शिबिरामुळे गावात अनेक समाज उपयोगी कामे करता आली.उदा.वृक्षारोपण,वनराई बंधारा,सीसीटी,तलावाचा गाळ काढणे,हागणदारी मुक्त गाव व रस्ता दुरुस्ती इत्यादी स्वरूपाची कामे केली.एनएसएस विभागा मार्फत आनंदवाडी हे गाव दत्तक घेतल्याने त्या गावाचा कायापालट झाला.हे मराठवाड्यातील पहिले हागणदारी मुक्त गाव ठरले.त्यामुळे महाराष्ट्र शासनाने येथे राज्यस्तरीय शिबिर घेतले.संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशे विद्यार्थी आले होते.याच शिबिरामध्ये आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी गावाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये चांगले काम केल्यामुळे विद्यापीठाने सन 2004 - 2005 तसेच महाराष्ट्र शासनाने सन 2006 -2007 मध्ये उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार देऊन माझा गौरव केला.

        सन 2007 मध्ये जलस्वराज विहिरी चे काम केल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, जवळच बांधलेल्या बंधार्‍यामुळे पाच ते सहा विहिरींना पाण्याचा फरक पडतो आहे. आनंदवाडी मधील जलस्वराज योजनेला जलतज्ञ राजेंद्र सिंह राणे यांनी सुद्धा भेट दिली.आजही ही नळ योजना व सिमेंट बंधारा एकदम उत्कृष्ट स्वरूपाचा आहे. 

    सराटे वडगाव आनंदवाडी मध्ये उत्कृष्ट जलस्वराज योजना,एन एस एस मुळे गावाचा कायापालट,आनंदवाडी हागणदारी मुक्त गाव या सर्व कामामुळे ग्रामस्थांनी मला सरपंच म्हणून निवडून दिले.सन 2008 मध्ये सरपंच झाल्यावर सराटेवडगाव हे गाव हागणदारी मुक्त केले.त्यामुळे गावाला राष्ट्रपतीच्या हस्ते पहिला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला.दोन्ही गावात ग्राम स्वच्छता अभियान उत्कृष्ट राबविल्यामुळे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हा प्रथम पुरस्कार मिळाला.तसेच गावात वृक्षारोपण व संवर्धनामुळे पर्यावरण ग्राम समृद्ध पुरस्कार मिळाला.अशा प्रकारे गावाला तीन पुरस्कार मिळाले.याच काळात गावात श्रमदानातून पाझर तलावातील गाळ काढला.डोंगरावर सीसीटी चे काम केले.तसेच प्रत्येक वर्षी ओढ्यावर व नदीवर वनराई बंधारे श्रमदानातून केली जात होती.अशाप्रकारे थोड्याफार प्रमाणात पाणलोटाची काम या कार्यकाळात पूर्ण केली.

            सन 2017 मध्ये पुन्हा लोकनियुक्त सरपंच झालो.माझी सरपंच होण्याची एकच इच्छा होती की मला राळेगणसिद्धी व हिवरे बाजार सारखे आनंदवाडी सराटे वडगाव हे जलसमृद्ध गाव करावयाचे होते.मी माझ्या मनात स्वप्न पाहिले होते की एक ना एक दिवस माझेही गाव जलसमृद्ध करणारच.हे स्वप्न मला शांत बसू देत नव्हते.याच काळात पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आष्टी तालुक्यात सन 2018 ला सुरू झाली होती.


नगरेची रचावी|जलाशय निर्मावी||

महावने लावावी | ना नाविधे||

          माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती कारण की मी गावचा सरपंच होतो तसेच अण्णा हजारे वर माझी पीएचडी झाली होती याचा मला स्पर्धेसाठी फायदा झाला.माझे एक स्वप्न होते की माझे गाव जलसमृद्ध व्हावे यासाठी मी या स्पर्धेत तन-मन धन घालून काम करण्याचे ठरविले.यासाठी दिवस-रात्र एक केला.टिकाऊ खोरे घमेले हातात घेऊन स्वतः सुरुवात केली.आपण जर काम केले तर गाव काम करील याची मला खात्री होती

            8 एप्रिलला रात्री 12 वाजता कामाला महाराजांच्या हस्ते सुरुवात केली.दिवसा ऊन असल्यामुळे श्रमदानाची कामे उन्हात करता येत नव्हती.त्यामुळे रात्री 9 ते 12 या वेळात लाईट लावून श्रमदानाची कामे केली.बांधबंधिस्ती,कंटूर बांध, सीसीटी, शोषखड्डा अशा प्रकारची कामे रात्री गावातील दीडशे ते दोनशे लोक एकत्र येऊन करत होती.रात्रीच्या श्रमदानासाठी मोठ्या प्रमाणात युवक महिलांचा सहभाग होता.ही सर्व कामे तंत्रशुद्ध पद्धतीने केली.ट्रॅक्टर मधून रात्री डोंगरावर लोकांना घेऊन जात असायचो.स्पर्धा कालावधीमध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल तर श्रमदान झाल्यावर तेथेच त्याचा वाढदिवस साजरा केला जात असे. ग्रामसभा घेऊन त्या दिवसाच्या कामाचा शेवट केला जात असायचा.

         45 दिवसात श्रमदानाची 6657•21 घनमीटर चे काम श्रमदानातून झाले झाले.यामध्ये सात सिमेंट बंधारे, बांधबंधिस्ती, कंटूर बांध, गॅबियन बंधारा, सीसीटी, एलबीएस इत्यादी स्वरूपाची कामे झाली.तसेचbjs संस्थेने पोकलेन मशीन दिल्यामुळे 21 शेत तलाव, ओढा खोलीकरण- रुंदीकरण, डीप सीसीटी असे 71,749•98 घनमीटर ची कामे झाली.या सर्व कामांचे वॉटर बजेट करण्यात आले.वृक्षारोपण केले,विहीर मोजमाप केले इत्यादी स्वरूपाची कामे करता आली.

        माथा ते पायथा स्वरूपाची कामे केल्यानंतर स्पर्धेच्या शेवटच्या राज्यस्तरीय टीम मध्ये आदर्श सरपंच पोपटराव पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी करण्यात आली त्या पाहणी दरम्यान त्यांनी कामाचे कौतुक केले

           आनंदवाडी गावाला राज्यातील तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले.हे बक्षीस 25 लक्ष रुपयाचे होते.आनंदवाडी गावाचे नाव संपूर्ण देशात झाले  .स्पर्धेच्या काळात बनविलेली पाणलोटाची स्ट्रक्चर पावसाने भरण्याची वाट आम्ही पाहत होतो.चांगला पाऊस झाल्यानंतर ती सर्व स्ट्रक्चर पूर्ण भरली व गाव जलसमृद्ध झाले.

               आनंदवाडी ने बक्षी जिंकल्यानंतर सराटे वडगाव ही नक्कीच बक्षीस जिंकू शकेल याची खात्री मला होती.स्पर्धेचा फॉर्म भरून सराटे वडगावचे 10 युवक व महिलांना पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी पाठविले.सन 2019 ची स्पर्धा ही पन्नास दिवसांची ठेवण्यात आली होती.स्पर्धेची सुरुवात बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आली.आठ एप्रिल 2019 ला रात्री बारा वाजता श्रमदानाच्या कामाची बांध बंदिस्तिपासून सुरुवात करण्यात आली.सराटे वडगाव मध्ये सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत 50 ते 60 युवक श्रमदानाचे काम करत होते.तसेच रात्री 350 ते 400 युवक महिला ग्रामस्थ श्रमदानाला येत होते.त्यामुळे सराटे वडगाव मध्ये बांधबंधिस्ती, कंटूर बांध, सीसीटी, छोटा मातीनाला, गॅबियन, चार छोटे सिमेंटचे बंधारे असे एकूण श्रमदानाचे 10,370•92 घनमीटर चे काम गावात 50 दिवसात झाले.

        यंत्र कामासाठी आम्हाला मानवलोक, ज्ञान प्रबोधनी, स्नेहालय यांनी पोकलँड व जेसीपी दिल्या.त्यामुळे 1500 मीटरचे नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करता आले.शेत तलाव डीप सीसीटी चे मोठ्या प्रमाणात काम केले.नदीच्या खोलीकरणादरम्यान जे बर्म सोडले होते ते 400 ट्रॅक्टर दगड वापरून त्याची पिचिंग केली  त्यामुळे नदीला कितीही पाणी आले तरी बर्म नदीचे तुटले नाही.असे एकूण 90,839•50 घनमीटरचे पाणलोटाचे काम झाले. 

        हा एक प्रकारे आमच्या गावाचा इतिहासच घडला होता कारण की हेच काम राळेगणसिद्धी व हिवरे बाजारला करण्यासाठी पंधरा वर्षे काळ लागला होता ते फक्त 50 दिवसात संपूर्ण गाव एकत्र आल्याने शक्य झाले.यावर्षीही पुण्याला बाळेवाडी येथे निकाल घोषित करण्यात आला व आमचे सराटे वडगाव हे गाव तालुक्यात पहिले तर राज्यातील 16 गावात त्याचा समावेश झाला होता.दहा लक्ष रुपयाचे बक्षीस गावाला मिळाले.

         अशाप्रकारे दोन्हीही गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून व इतरही सेवाभावी संस्थेकडून आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळे पाणलोटाचे माथा ते पायथा असे कधीही न होणारे उत्कृष्ट काम पूर्ण झाले.

  बीड जिल्ह्यातील एक आदर्श गाव साकारल्यामुळे ICICI फाउंडेशनच्या जिल्हा समन्वयक श्री चेतन पाटोळे सरांनी पाच वर्षासाठी आमचे गाव दत्तक घेतले.आमच्या गावाचे  1500 मीटरचे नदी खोलीकरणाचे काम राहिले होते ते आयसीआयसीआय फाउंडेशनने दोन वर्षात म्हणजे  सन 2020 मध्ये सराटे वडगावचे 500 मीटर व आनंदवाडीचे सन 2021 मध्ये 1000 मीटरचे नदी खोलीकरण रुंदीकरण व वृक्ष लागवडीचे काम केले.फाउंडेशन ला चार लक्ष रुपयाचा लोक वाटा देण्यात आला नदी खोलीकरणामुळे गावाचे 90% पान लोटाचे काम पूर्ण झाले सराटे वडगाव आनंदवाडी मिळून तीन हजार मीटर(3कि.मी.)नदीचे खोलीकरण झाले यामुळे गावाचा कायमचा पाण्याचा प्रश्न मिटला याशिवाय आयसीआयसीआय फाउंडेशनने वेगवेगळे प्रशिक्षण सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना फळांचे वृक्ष वाटप घनवन, शेती पूरक लघुउद्योग प्रशिक्षण इत्यादी स्वरूपाची कामे सराटे वडगाव मध्ये केले.महाराष्ट्रातील पहिले कार्बन न्यूट्रल व्हिलेज म्हणून गावाची निवड केली.

      नदी खोलीकरणामुळे १२६ बोरवेल व ५८ विहिरींना तसेच शेजारील मेहेकरी रुई टाकळी या गावाची पाणी पातळी वाढली.मार्च महिन्यामध्ये नदीच्या कडेच्या विहिरी उपसत होत्या परंतु जलसमृद्ध चे काम केल्यामुळे नदीच्या कडेच्या विहिरीचे पाणी मे महिन्यापर्यंत सुद्धा पाणी राहते.अशाप्रकारे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण म्हणजे जलसमृद्ध झाले शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात लाखाने वाढ झाली हे केवळ पाणलोटाचे काम केल्याने शक्य झाले

       दोन्ही गावे जलसमृद्ध झाल्यामुळे बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माझी निवड पुणे येथे केंद्र शासनाच्या सरपंच कार्यशाळेसाठी केली.संपूर्ण भारतातून १२०० सरपंच आले होते.त्यांना जलसमृद्ध गाव कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले व केलेल्या कामाची3•30 मिनिटाची गावाची यशोगाथा फिल्म द्वारे  दाखविली.त्यामुळे गावाचे नाव पुन्हा देश पातळीवर गेले.तेथे प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन माझा सन्मान केला.

       सराटे वडगाव आनंदवाडी गावाचा विकास आयसीआयसीआय फाउंडेशन व पाणी फाउंडेशन,इतर सेवाभावी संस्था ग्रामस्थ अधिकारी एनएसएस विभाग तसेच मला गावांनी सरपंच पद देऊन सेवा करण्याची संधी दिल्यामुळे शक्य झाले.माझे जलसमृद्ध गाव करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे जीवनात समाजासाठी काहीतरी थोडे काम करता आले याचे समाधान आहे. 

    *समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा होय*









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.