नीलिमा चव्हाणच्या हत्येला आत्महत्येचे वळण...??
नाभिक समाजात तीव्र संतापाची लाट,
न्यायासाठी जनसेवा पक्षाचीही राज्य महिला आयोगाकडे धाव
प्रतिनिधी : संजय पंडित
दि.९, पुणे : ओमळी,चिपळूण येथील नाभिक समाजातील २४ वर्षीय तरुणी दिनांक २९ जुलै पासून गायब झाली होती. दापोलीहून आपल्या घरी ओमळी गावी निघाली असताना ती घरी मात्र पोहचलीच नाही.दोन दिवसानंतर पोलीस तपासात तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत आढळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मृत देहाशी झालेली छेडछाड पाहता हा घातपाताचा प्रकार असल्याचा दाट संशय बळावला होता.रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरातील नाभिक समाजाने तिच्या मारेकऱ्यांचा तात्काळ शोध घेऊन कठोर शिक्षा होण्यासाठी तहसीलदार,जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर यांना निवेदने देण्यात आली होती.गुहाघरचे आमदार भास्कर जाधव यांनीही हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.नीलीमाच्या मारेकऱ्यांना १२ ऑगस्ट पर्यंत अटक न झाल्यास राज्यभरातील नाभिक समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाच्या इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान या दुर्दैवी घटनेला आठ दिवस उलटून गेल्यानंतर काल रत्नागिरी पोलिसांनी आजवरच्या तपासाच्या प्राथमिक अंदाजानुसार घातपाताचा कोणताही पुरावा न मिळाल्याने पत्रकार परिषद घेऊन हा घातपाताचा प्रकार नसल्याचे सांगितले. नीलिमाने आत्महत्या केल्याचेही नाकारता येत नसल्याचे यावेळी सांगितले.
पोलिसांच्या या प्रथमदर्शनी तपासाच्या अहवालावर चव्हाण कुटुंबीय समाधानी नसून पोलिसांच्या या अहवालाने राज्यभरातील नाभिक समाज देखील अतिशय संतापला असून पोलिसांच्या तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करीत असल्याचा दाट संशय नाभिक समाजातील कार्यकर्त्यांना वाटत आहे.
वास्तविक नीलिमा चव्हानच्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यानंतर ही हत्याच झाली असल्याचा ठाम विश्वास नाभिक समाजाला असल्याने या अहवाला विषयी सर्वत्र संतापजनक वातावरण पहावयास मिळत आहे.
नीलिमा चव्हाणला १२ ऑगस्ट पर्यंत न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरून राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल असा गर्भित इशारा देखील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान आपल्या भगिणीला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडीने आता राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली असून महिला आयोगाने या केस मधे हस्तक्षेप करून नीलिमा चव्हाणला न्याय मिळवून देण्याची कळकळीची विनंती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना करण्यात आली आहे.
राष्ट्रीय जनसेवा पक्षाच्या महिला आघाडी उपाध्यक्षा वानिताई भालेकर यांच्या नेतृत्वात काल राज्य महिला आयोगाला याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.
नीलिमा चव्हाण हत्येची कसून निष्पक्ष चौकशी करून तिच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी आणि त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी पक्षाच्या महिला आघाडी उपाध्यक्षा वानिताताई भालेकर यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई चौधरी,राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्षा उमाताई नाईक,राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर सरचिटणीस फ्रॉफेसर नंदिनी सूरते,ओबीसी सेल अध्यक्षा वंदनाताई कुमावत आणि आणि नाभिक समाजातील महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




stay connected