आष्टी तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत पावसाने दडी मारल्याने बाजारपेठेवर परिणाम पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली उत्पन्नात ही घट होणार

 आष्टी तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
पावसाने दडी मारल्याने बाजारपेठेवर परिणाम
पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली उत्पन्नात ही घट होणार



आष्टी ता.२५ ( शेख निसार )- तालुक्यात पावसाळा सुरू होऊन अडीच महिने झाले तरीही आष्टी तालुक्यात अद्याप पर्यंत मोठा पाऊस झाला नाही. कधी ढगाळ वातावरण तर कधी रिमझिम पाऊस. याच रिमझिम पावसावर पावसावर बळीराजाने पुरेशी ओल नसताना काळ्या आईची ओटी भरत खरीपाची पेरणी केली. रिमझिम पावसावरच कशीबसी पिके आली. उडिद अक्षरशः खोडमाशी व‌ मर रोगाने ४० हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटल्याने उत्पन्नात ही घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ऑगस्ट महिना ही संपत आला तरी ही मोठा पाऊस नसल्याने छोट्या मोठ्या धरण तलावांनी तळ गाठला आहे. ऑगस्ट अखेरीस पाऊस झाला नाही तर पिके वाया जाण्याची भीती बळीराजाला सतावत आहे. पाऊस नसल्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेवर दिसून येत आहे.परिणामी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांची डोळे आभाळाकडे लागले आहेत.


आष्टी तालुक्यात अडीच महिने झाले तरी देखील तलाव धरणांची पाणी पातळी तळालाच आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या पूर्ण केल्या परंतु आता पिके पाण्यावाचून सुकु लागली आहेत. मागिल वर्षी चांगला पाऊस झाला पिके चांगली आली यावर्षी ही चांगले उत्पन्न होईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पेरणी करून महागडी खते, बी बियाणे, औषधे यावर मोठा खर्च केला. परंतु पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. उडिद, तुर,कापुस, सोयाबीन, मका, बाजरी,कांदा आदी पिकांना पाऊस पडला तर जिवनदान मिळणार आहे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढावेल. पावसाने दडी मारल्यामुळे नदी नाल्या तलाव कोरडे ठाक पडले आहेत. पेरणी केलेल्या पिकांना पाणी कोठून देणार?  या आठवड्यात पाऊस न पडल्यास पिके वाया जातील अशी भिती शेतकऱ्यांना भेडसावत आहे. अद्यापर्यंत पाऊस दमदार झालाच नसून आॅगस्ट महिना तर कोरडाच चालला आहे. आठ दिवसांत पाऊस झाला नाही तर पिके वाया जाण्याची भीती बळीराजाला असून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

---------

पाण्याचा ताण कमी करण्यासाठी पिकांवर फवारणी करावी


तालुक्यात ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने दडी मारली आहे खरीप हंगामातील सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असून पिकांना पाण्याचा ताण पडत असल्यास पोटॅशियम नायट्रेट १३:०:४५  विद्राव्य खताची ५० ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी जेणेकरून पीक पाण्याचा ताण सहन करून आठ ते दहा दिवस टिकू शकते.


- गोरख तरटे ( तालुका कृषी अधिकारी, आष्टी )

--------

बळीराजाच्या अडचणीत भर


यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने नैसर्गिक संकटाचे सावट तालुक्यावर कायम आहे. सध्या ऊन - सावलीचा खेळ अन सोसाट्याचा वारा सुरु आहे ८ ते १० दिवसांत पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर पिके वाचविण्याची नैसर्गिक संकटाची टांगती तलवार कायम आहे. यावर्षी तरी निसर्ग अवकृपा दाखवणार नाही अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहे. मात्र आॅगस्ट महिना संपण्याच्या उंबरठ्यावर असताना देखील मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.