गणेश विसर्जन व ईद ए मिलाद एकाच दिवशी ; सलोख्या साठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार
अहमदनगर प्रतिनिधी : गेल्या काही काळापासून अहमदनगर शहरातील सामजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर यावर्षी एकाच दिवशी आलेले गणेश विसर्जन आणि ईद ए मिलाद हे उत्सव कसे साजरे होणार, याचा पेच निर्माण झाला होता. विशेष म्हणजे अहमदनगरमध्ये या दोन्ही मिवरणुकांची वेळ आणि मार्गही एकच असतो. अशा परिस्थितीत ईद उत्सव समितीच्या पुढाकाराने हा पेच सुटला आहे. ईद त्याच दिवशी घरात साजरी करायची आणि मिरवणूक गणेश विसर्जनानंतर १ ऑक्टोबरला काढायची असा निर्णय उत्सव समिती आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे मोठा प्रश्न सुटला असून पोलिस प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
यावर्षी २८ सप्टेंबरला गणेश विसर्जन आहे. त्याच दिवशी ईद ए मिलाद (मोहम्मद पैगंबर जयंती) आहे. दोन्ही मिरवणुका एकाच दिवशी एकाचवेळी निघल्याने पेच निर्माण होऊ नये, यासाठी तख्ती दरवाजा ईद उत्सव समिती तसेच मोहरम उत्सव समिती यांच्या पुढाकारातून तख्ती दरवाजा येथे बैठक झाली. बैठकीला शहराचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, ईद उत्सव समितीचे शेख अब्दुल कादीर, मोहरम समितीचे करीम हुंडेकरी, खलील सय्यद उपस्थित होते. ईद त्याच दिवशी म्हणजे २८ सप्टेंबरलाच घरोघरी आणि मशिदींमध्ये साजरी करायची. मिरवणूक मात्र रविवारी १ ऑक्टोबरला नेहमीच्या मार्गावरून काढायची, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. याबद्दल पोलिसांतर्फे कातकडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. असाच समजूतदारपणा राज्यातील इतर ठिकाणीही दाखविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
stay connected