विशेष लेख
----------------
प्रा.महेश चवरे,आष्टी.
---------------------------
राजकारणातील भीमशक्ती
**************************
भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे या लोकशाहीचा मुख्य गाभा व आत्मा त्यांत होणाऱ्या निवडणुका मध्ये आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने जे होत जे घडतं ते म्हणजेच राजकारण,हे राजकारण कोणासाठी व्यसन असतं, कोणासाठी वारसाहक्क असतो
,कोणकरिता अचानक मिळालेली संधी असते किंवा कोणावर अपघाताने पडलेली जबाबदारी असते हेच राजकारण कोणाचा व्यवसाय वा समाजसेवेसाठी जोपासलेली आवड ही ठरते.
राजकारणाच्या या विशाल पटावरती प्रत्येक जण वेगवेगळ्या पैलूंनी वावरत असतो.भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून जातीय व्यवस्थेचा पगडा समाजाच्या मनावर घट्ट रुजला आहे त्याला हे राजकीय क्षेत्रही अपवाद नाही आजही निवडूनकीत उभा राहणाऱ्या उमेदवाराला मतदान करताना त्याची जात हा निकष लावला जातो,हा आपल्या जातीचा नेता तो दुसऱ्या जातीचा नेता असे म्हणले जाते.परंतु या जातीय व्यवस्थेच्या विळख्यात असलेल्या राजकारणातही देशाच्या,
महाराष्ट्राच्या राजकारणातील काही राजकीय नेते अपवाद ठरले आहेत त्यातीलच एक लढवय्ये नेतृत्व म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी,
पाटोदा,शिरूर मतदारसंघाचे नेते भीमराव धोंडेसाहेब... मराठा,वंजारी बहुल जातीय लोकांचे बहुमत असलेल्या या मतदारसंघाचे गेले ५० वर्षे धोंडेसाहेब सातत्याने नेतृत्व करत आहेत.ते स्वतः ऐका अल्पसंख्याक असलेल्या एकट्या माळी समाजाचे नेते नसून सर्व जाती धर्माचे नेते आहेत हे त्यांच्या वागण्यातून नेहमीच दिसल्यामुळे लोकांच्या अंतःकरणात धोंडेसाहेबांचे नेतृत्व बसले.धोंडेसाहेबांनी राजकारण नेहमी तत्वांचे व विचारांचे केले म्हणूनच ५० वर्षे त्यांचे राजकारण सत्तेत असो वा नसो ते कायम टिकून आहे.आपल्या नम्र आणि संयमी वागण्यामुळे लोकांचे मन नेहमीच त्यांनी जिंकले म्हणूनच लोकांनीही जिंकलेल्या मनाचे त्यांच्या मतात परिवर्तन करून प्रत्येक निवडणुकीत साहेबांना मोठया संख्येने मतदान दिले.
राजकारणाचा हेतु कायम विधायक कामासाठी ठेवल्यामुळे मतदारसंघाचा विकास व जनतेचे कल्याण या दोन बाबीकडे त्यांनी जास्ती लक्ष दिले.निवडणुकातील जय पराजयचा त्यांनी कधी विचार केला नाही निरंतर जनसेवेचे आपले काम त्यांनी चालूच ठेवले.
निवडणुकीत मत मिळवण्यासाठी तरुणांना आर्थिक आमिषे दाखवून व्यसनाच्या आहारी जाण्याला त्यांनी कायम विरोध केला त्यामुळे कदाचित त्यांचे राजकीय नुकसान ही झाले असेल.धोंडेसाहेब स्वतः एक कबड्डी व कुस्तीचे उत्कृष्ठ खेळाडू आहेत त्यामुळे शरीर स्वास्थ्य व त्यासाठी करावयाचा व्यायाम याची त्यांना उत्तम जाण आहे आजही या वयात ते मैदानात रोज न चुकता तरुणांना ही लाजवेल अशा प्रकारचे व्यायाम प्रकार करतात,एका विधानसभेच्या निवडणुकीत साहेबांचा पराभव झाला परंतु दुसऱ्याच दिवशी सकाळी साहेब व्यायामासाठी मैदानात हजर होते त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच ते शारीरिक स्वास्थ्य व त्यासाठी व्यायामाचे महत्व याची माहिती देताना नेहमीच दिसतात,खेळाडूंना प्रोत्साहन व प्रसंगी आर्थिक मदतही करतात.मतदार संघातील जनतेच्या विविध मागण्यासंसाठी सर्वाधिक पायी मोर्चे काढणारे धोंडेसाहेब हे एकमेव महाराष्ट्रातील नेते आहेत. ज्यांनी आष्टीच्या तहसीलपासून दिल्लीच्या संसदेपर्यंत पायी मोर्चे काढले आहेत.बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात धोंडे साहेबांची संस्था नंबर एकवर आहे,जिल्ह्यातील विध्यार्थ्यांची इथेच शिकण्याची सोय व्हावी म्हणून बरेच शैक्षणिक व व्यावसायिक कोर्सेस त्यांनी मतदारसंघात चालू केले आहेत,
बऱ्याच गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा त्यांनी सुरू केल्या आहेत.आज त्यांच्या शिक्षण संस्थेत अठरा पगड जातीचे हजारो कर्मचारी विविध पदावर काम करतात. आपला कौटुंबिक उदरनिर्वाह चालवतात धोंडेसाहेबांमुळे अनेक लोकांना रोजगाराची संधी यामार्फत उपलब्ध झाली आहे सर्व कर्मचारी वर्ग मतदारसंघात राहायला असल्यामुळे येथिल व्यापारी बाजार पेठाही मोठ्या झाल्या आहेत.त्यांच्या शिक्षण संस्थेतील एखादा विद्यार्थी जर केंद्रीय स्पर्धा परीक्षेत(युपीएससी)पास झाला तर साहेबांनी त्याला पाच लक्ष रुपये बक्षीस संस्थेच्या वतीने घोषित केले आहे.धोंडे साहेबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबातला म्हणून त्यांना शेती व शेतकरी या दोन्हीची विशेष आवड आहे त्यामुळेच त्यांनी त्यांच्या संस्थेचे नाव ही शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ असे ठेवले आहे.त्यांना शेतीत नवनवीन प्रयोग करायला आवडते,शेती उत्पादना संबंधीत नवीन माहिती घेणे त्याचा अभ्यास करून त्याचा जमेल तसा प्रचार करणे ही त्यांची आवड आहे.
त्यांच्या संस्थेच्या कृषी महाविद्यालयाचा परिसर तर एखाद्या विद्यापीठ परिसरापेक्षा कमी नाही.धोंडेसाहेब नेहमी विविध भागांतील व्यवसायिक प्रकल्पांना भेटी देतात त्यातून नवीन काहीतरी समजून घेण्याचा,शिकण्याचा प्रयत्न करतात.व्यवसाय उद्योगाला चालना देण्यासाठी त्यांनी महेश मल्टीस्टेट या पतसंस्थामार्फत बँकिंग क्षेत्रात यशस्वी पदार्पण केले आहे.नवीनच गततवर्षीच त्यांनी संस्थेमार्फत एक लाख बांबू वृक्ष लागवड केली आहे.त्यांच्या सत्तेच्या कारकिर्दीत मतदार संघात सर्वाधिक गावे डांबरी रस्त्याने जोडण्याचे कामे झाले आहेत म्हणूनच त्यांना रस्तेमहर्षी म्हणूनही संबोधले जाते.मतदार संघात एखादी नैसर्गिक आपत्ती आली तर आपल्यावतीने त्यांना काय मदत करता येईल यासंबंधी नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. कोरोना संकट काळात हजारो गरजूंना किराणा वाटप केले. तीन ही तालुक्यातील सरकारी कोविड सेंटरवर रुग्णांसाठी सलग १०० दिवस अन्नछत्र चालवले.धोंडेसाहेबांना वारकरी सांप्रदायाचे आकर्षण आहे.सर्व विषयांच्या वाचनाची आवड त्यांना असल्यामुळे संप्रदायीक वाचन ही त्यांचे होते पंढरपूर आषाढी वारीनिमित्ताने मोठे अन्नदान वारकऱ्यांसाठी प्रत्येक वर्षी ते करतात.आष्टी येथील मुर्षदपूर भागात ज्ञानेश्वर महाराज चाकरवाडीकर माऊली यांच्या मंदिरासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची जमीन माऊली ट्रस्टला दान दिली आहे,त्यावर भव्यदिव्य असे माऊली मंदिर आज उभे आहे.आष्टी तालुका कायम अवर्षणग्रस्त आहे त्यामुळे नैसर्गिक परिस्थिती कायम असमतोल असते वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे व धोंडे साहेबांनी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या कडा सहकारी साखर कारखान्याला उतरती कळ लागली,मंजूर झालेली सहकारी सूत गिरणी पूर्णत्वास गेली नाही या दोन उन्या बाजू धोंडेसाहेबांच्या राजकीय कारकिर्दीत घडल्या त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली.भीमराव धोंडे यांना लोक साहेब म्हणतात ,त्यांच्या व्यक्तिमत्वात ते साहेबपण दिसते ही परंतु सर्वांसाठीच साहेब असलेले धोंडेसाहेब सगळ्यांच्या सुख दुखातही घरच्यासारखे सामील होतात हेच त्यांचे वेगळेपण ठरते.कुठल्याही पक्ष,नेता,
कार्यकर्त्यांप्रती कसलीही कटुता ते मनात ठेवत नाहीत चुकीचे घडले ते सोडून देऊन पुढे जाण्याची मानसिकता त्यांची असते.
धोंडेसाहेब आज भाजप या पक्षामध्ये आहेत पण आपल्या पुरोगामी विचारांशी त्यांनी कधी तडजोड केली नाही किंबहूना तो जपला तो विचार वाढविण्याचा नेहमीच प्रयत्न केला.कुठलीही राजकिय पार्श्वभूमी वा त्या अनुषंगाने अनुकूल परिस्थिती नसतानाही धोंडेसाहेबांनी स्वकर्तुत्वाने निर्माण केलेल्या या भीमशक्तीला सोडून या आष्टी विधानसभा मतदारसंघाचेच नव्हेतर बीड जिल्ह्याचे राजकारण होणार नाही कारण त्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट आणि
तळागाळापासून जोडलेली विविध जातीधर्माची असंख्य माणसं जी कायम त्यांच्या बरोबरच असतात.
अशा या लोकनेता असलेल्या भीमराव धोंडेसाहेब यांचा जन्मदिवस ५ ऑगस्टला विविध उपक्रम घेऊन साजरा होतो आहे त्यानिमित्ताने धोंडेसाहेबांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व त्यांच्या हातून मतदारसंघाची सेवा येणारी अनेक वर्षे घडो ही भगवंत चरणी प्रार्थना...!!
लेखक-
प्रा.महेश चौरे,
आष्टी.
----------------------------------------






stay connected