केजच्या रेशनवर डुकरांचा डल्ला ; पुरवठा विभागाकडून सर्वसामान्य रेशन धारकांच्या जीवाशी खेळ.
केज : (रंजित घाडगे ) -
येथील पुरवठा विभागाकडून सर्वसामान्य रेशन धारकांच्या जीवाशी खेळ चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. घाणीचे साम्राज्य तुडविणाऱ्या वराहांचा पुरवठा रेशनच्या धान्य गोडाऊनमध्ये उच्छाद सुरू असून गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ संताप आणणारा आहे. विशेष म्हणजे जे रेशन सर्वसामान्य नागरिकांना वाटप केले जाते त्याच गोडाऊनमध्ये वराहांचा धान्य खातानाचा प्रकार सुरू आहे. केज शहरातील शासकीय धान्य गोडाऊनमधील या धक्कादायक प्रकाराने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागात धान्यपुरवठा केला जात असलेल्या गोडाऊन मध्ये धान्याची काळजी घेतली जाते का ?, आपण रेशन दुकानावरून आणलेले धान्य खरंच चांगले आहे का…?, आपल्या डोळ्याच्या आड कोणती वस्तू कुठून येते आणि कशा पद्धतीने येते हे आपण ओळखू शकत नाही. मात्र, हेच धान्य गोरगरिबांच्या मुखात जाणार आहे, गरजू आणि भुकेल्यांच्या पोटाची आग भागवणार आहे आणि त्याची राखण करण्यासाठी, काळजी घेण्यासाठी सरकारकडून गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचे कसलेही गांभीर्य नाही. हा गोरगरिबांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असून डुकरं ताव मारत असलेलं धान्यच गोरगरिबांना वाटत करण्यात येत आहे.
हेच धान्य ग्रामीण भागातील गोरगरीब जनता खात असते, याची शासनाने काळजी घेतली पाहिजे. ग्रामीण भागात धान्य पुरवठा करताना प्रत्येक पोत्यामध्ये दोन ते तीन किलो धन्य कमी येत असल्याचा प्रकारही या ठिकाणी उघडकीस आलेला आहे आणि यावर तक्रार करून देखील काहीही फरक पडत नसल्याचे बोललं जात आहे.
आजपर्यंत प्रशासनातील काही कुत्रे जगले आणि आता डुकरं जगत आहेत !
शासनाच्या स्वस्त धान्यात काळा बाजार करून आजपर्यंत अनेकांनी तोंड काळे करण्याचा प्रकार केला. गावातील स्वस्त धान्य दुकानापासून ते पुरवठ्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच गोडाऊन किपर यांनी गोरगरिबांसाठी येणाऱ्या याच धान्याचा काळा बाजार करून लाखो, करोडोंची मालमत्ता जमवली. खरे पाहिले तर
गोरगरिबांच्या हक्काच्या स्वस्त धान्यावर आजपर्यंत प्रशासनातील काही कुत्रे पोट भरत होते, आता मात्र डुकरंही जगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.



stay connected