Annabhau Sathe Jayanti 2023 : मी जे जीवन जगतो,बघतो, अनुभवतो तेच लेखणीतून लिहतो

 Annabhau Sathe Jayanti 2023 : मी जे जीवन जगतो,बघतो, अनुभवतो तेच लेखणीतून लिहतो



*****************************


'पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर  वसलेली नसून ती शेतकरी, कष्टकरी कामगारांच्याच्या तळहातावर वसलेली आहे' असे सांगणारे तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक योद्धे लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे,त्यांचा जन्म ०१ ऑगस्ट इ.स. १९२० रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव  या गावी एका मांग जातीच्या कुटुंबात झाला, त्यांचे संपुर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे होते त्यांना सर्व अण्णाभाऊ या टोपण नावाने ओळखत. त्यांच्या वडीलांचे नाव भाऊराव साठे व आईचे नाव वालुबाई होते.  आण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेले नंतर तेथील सर्वणांद्वारे होणाऱ्या भेदभाव,कर्मठ अशी जातीय व्यवस्था व पराकोटीच्या गरिबीमुळे त्यांनी लहानपणीच शाळा सोडून दिली. त्यांनी दोन विवाह केले होते. त्यांची पहिली पत्नी कोंडाबाई तर दुस-या पत्नी जयवंता, त्यांना एकूण तीन अपत्ये होती त्यात मधुकर, शांता आणि शकुंतला.

अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५ कादंबऱ्या लिहिल्या ज्या मध्ये फकिरा ही त्यांची लोकप्रिय कादंबरी समाविष्ट आहे, तिला इ.स. १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे. त्या कादंबरीला जगभरातील साहीत्य क्षेत्रात मनाचे स्थान आहे, आण्णाभाऊंनी  त्यांची फकीरा ही कादंबरी  डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे. तसेच आण्णाभाऊंनी 'अग्निदिव्य' ही कांदबरी छ. शिवाजी महाराजांचे सरसेनापती  प्रतापराव गुज्जर यांच्यावर लिहली आहे.  आण्णा भाऊंचा१५ लघुकथांचा संग्रह आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि २७ अ-भारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेल्या आहेत. कादंबरी आणि लघुकथा यांच्याव्यतिरिक्त त्यांनी नाटक, रशियातील भ्रमंती, १२ पटकथा,मराठी पोवाडा,सुदंर लावण्या,तमाशातील वघनाट्य व विविध शैलीतील गाणी लिहिली.जगाच्या इतिहासात फक्त दीड दिवस शाळेत जाऊन इतके विपुल साहित्य निर्माण करणारे फक्त अण्णाभाऊ साठे हेच आहेत.आण्णाभाऊंची लेखणी म्हणजे खऱ्या अर्थाने स्वत्वाची जाणीव ते म्हणतात मी जे जीवन जगतो,बघतो,अनुभवतो तेच लेखणीतून लिहितो मला कसल्याही कल्पनेच्या भराऱ्या मारता येत नाहीत त्याबाबतीत मी स्वतःला एक बेडूक समजतो यावरूनच त्यांच्यातील लेखक कसा महाराष्ट्रातील मातीशी कसे घट्ट नाते पकडून होता हे दिसून येते.आपल्या लेखनातून त्यांनी दलित कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली,जातीय व्यवस्थेमुळे नैराश्यात सापडलेल्या लोकांना ते म्हणत नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते ती धूळ झटकली की तलवार पुन्हा धारदार बनते म्हणून उठा जागे व्हा या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करा,मनावर साचलेली नैराश्यची धूळ साफ करा.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अण्णाभाऊ रशियाला गेले होते,परदेशात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा गाणारे ते पहिलेच शिवशाहीर ठरले होते त्यामुळेच रशियाच्या राष्ट्रअध्यक्ष यांनी त्यांचा गौरव केला होता त्यांच्या मनावर लढवय्या कार्ल मार्क्स च्या विचारांचा मोठा प्रभाव होता,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लढावू व विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजले होते म्हणूनच बाबासाहेबांना ते आपल्या गुरुस्थानी मानत असत.

अण्णाभाऊ साठेचं नाव घेतल्या शिवाय संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही. कारण सारा महाराष्ट्र अण्णाभाऊंनी अमर शेख यांच्या साथीने जागवला-पेटवला होता. त्यांनी तेव्हाच गुजराती लोकांच षढयंत्र ओळखून ते हाणून पाडण्याचंही काम आण्णाभाऊ साठेंनीचं केल होत.

भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर उच्चवर्णीयांचे भारतावरील शासन आण्णाभाऊ साठेंना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी १६ आँगस्ट १९४७ रोजी मुंबईमध्ये पावसात  वीस हजार लोकांचा मोर्चा काढला होता, शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणात ते म्हणतात हे स्वातंत्र्य गोऱ्या लोकांनी मूठभर श्रीमंत काळ्या लोकांच्या हातात दिले आहे हे मिळालेले स्वातंत्र्य खोटे आहे कारण आजही माझ्या देशातील ऐंशी टक्के समाज उपाशी आहे,असल्या खोट्या स्वातंत्र्याचा त्याला काहीही उपयोग झाला नाही उलट तो समाज आजही मूठभर लोकांचा गुलाम म्हणूनच जगतो आहे.

१९४४ ला त्यांनी  लाल बावटा कला पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.

उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरवले गेलेले, दलित आणि श्रमिक यांच्या समृद्घीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात आले होते.तेच स्वप्न पुढील पिढीकडून सत्यात उतरवण्यासाठी आपल्या साहित्यात प्रकर्षाने विविध माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे अण्णाभाऊ त्यांच्या एका गीत रचनेत म्हणतात

'जग बदल घालुनी घाव । सांगूनि गेले मज भीमराव ॥'

'गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऐरावत,

अंग झटकून निघं बाहेरी घे बिनीवरती धाव, सांगून गेले मला भीमराव!!

हे त्यांचे गीत खूप गाजले. त्यांनी लिहिलेल्या लावण्यांत 'माझी मैना गावावर राहिली,माझ्या जीवाची होतीया कायली' ही लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला एक वेगळीच प्रेरणा देणारी ठरली, गोवा राज्याच्या मुक्ती संग्रामात अण्णांभाऊनी मोलाची भूमिका बजावली होती,मुंबईत गिरणी कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला होता.

शिवशाहीर आण्णाभाऊ साठेंची एक कादंबरी आहे तीचे नाव 'चिखलातील कमळ' या कादंबरीवर १९६१ साली 'मुरळी मल्हारी रायाची' नावाचा चित्रपट निघाला होता. अशा लेखक, साहित्यिक, नाटककार, लोकसम्राट, वगसम्राट,तमाशा कलावंत, शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ०१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने विशेष ₹ ४ टपाल  तिकीट त्यांच्या नावाने प्रसिद्ध केले आहे. तसेच महाराष्ट्रातील विद्यापीठांत अण्णाभाऊंवर अनेक संशोधकांनी अकरा प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. पुणे विद्यापीठात त्यांच्या सन्मानार्थ अण्णाभाऊ साठे अध्ययन वर्ग सुरु करण्यात आले आहेत.  पुण्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक आणि कुर्ला मध्ये एका उड्डाणपूलासह अनेक इमारतींना त्यांचे नाव देण्यात आले आहे.

अशिक्षित असणाऱ्या आण्णाभाऊंनी समाजाला दिलेले विचार आणि त्यांचे साहीत्य आजच्या सुशिक्षित तरूणांनी स्वतः वाचून इतरांनाही वाचण्यास प्रवृत्त करणे ही आज काळाची गरज आहे. कारण त्यांचे विचार जेव्हा घराघरापर्यंत पोहोचतील व त्या संघर्ष विचारांची अंमलबजावणी केली जाईल त्याचवेळी आजही सर्वार्थाने उपेक्षित असलेला समाज नवीन  युगाच्या आधुनिक विचारसरणीच्या मुख्य प्रवाहात येईल व तेच खऱ्या अर्थाने आण्णाभाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त खरे  विनम्र अभिवादन ठरेल. 


लेखक-
प्रा.महेश कुंडलीकराव चौरे,
आष्टी.
मो.9423471324





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.