टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण ६५ हजार लोकसंख्येचा भार दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर वीज पाणी निवासस्थानाची समस्या कायम

टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राला रिक्त पदांचे ग्रहण
६५ हजार लोकसंख्येचा भार दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर
वीज पाणी निवासस्थानाची समस्या कायम





आष्टी ता.२२ (बातमीदार)-तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ३३ पैकी तब्बल १८ पदे रिक्त असून ६५ हजार लोकसंख्या असलेल्या केंद्राचा भार २ वैद्यकीय अधिकारी सांभाळत आहेत. येथे वीज पाण्याची समस्या कायम असून त्या बरोबरच कर्मचाऱ्यांसाठी राहणे योग्य निवासस्थान नाही. रिक्त असलेली विविध पदे भरण्यासाठी अनेकदा वरिष्ठांकडे पाठपुरावा केला परंतु समस्या कायम असून येथील समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. 


आष्टी तालुक्यातील टाकळसिंग प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत खडकत, हरिणारायण आष्टा, आष्टी, मुर्शदपूर, पोखरी, ब्रम्हगांव, मंगरूळ हे उपकेंद्र असून या उपकेंद्रांतर्गत ६५ हजार लोकसंख्यासाठी ३ आरोग्य अधिकाऱ्यांपैकी २ पद भरलेली असून १ पद रिक्त आहे. आरोग्य सहायक (पुरुष) २ पैकी १ पद रिक्त आहे, आरोग्य सहायिका २ पदे रिक्त आहेत, आरोग्य सेविकाची १७ पदे मंजूर असून ५ पदे भरले आहेत तर १२ पद रिक्त आहेत,  आरोग्य सेवकाचे १ पद रिक्त आहे. याचा परिणाम येथील आरोग्य कर्मचाऱ्यावर पडत आहे. येथे वीज आहे परंतु कायम विजेचा लपंडाव सुरू असतो तर कधी कमी जास्त विजेच्या प्रवाहामुळे विजेचे उपकरणे जळत आहेत. पाण्याची समस्या येथे कायमच भेडसावत असते. पूर्वी वीज व पाण्याची समस्या जाणवत नव्हती. अपुरा कर्मचारी वर्ग असतानाही  येथे कुटुंब शस्त्रक्रिया, प्रसूती, लसीकरण, बाह्य रुग्ण सेवा मोठ्या प्रमाणात होत होते. त्याचे प्रमाण आता कमी झाल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने आहेत परंतु राहणे योग्य नसल्याने तसेच टाकळसिंग हे खेडे गाव असल्याने येथे भाड्याने रूम मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे.दिवसेंदिवस नवनवीन आरोग्याचे  राष्ट्रीय कार्यक्रम येत आहेत ते राबवताना अडचण निर्माण होत आहे. सर्व सामान्य नागरिकांपर्यंत त्या योजना पोहचत नाहीत. परिणामी कामाच्या अतिरिक्त ताणामुळे कर्मचारी आणि वैद्यकिय अधिकारी यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. शासनाने रिक्त पदे लवकर भरल्यास सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व सामान्य नागरिकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोचविण्यासाठी मदत होईल, तसेच आरोग्य विभाग ग्रामीण भागात बळकट करण्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.

________

३३ पैकी १८ पद रिक्त
वैद्यकीय अधिकारी - १ पद रिक्त, आरोग्य सहायक - १ पद रिक्त,
आरोग्य सहाय्यिका - २ पद रिक्त,
आरोग्य सेविका - १२ पद रिक्त,
परिचर - २ पद रिक्त असे एकूण १८ पद रिक्त आहेत.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.