सामाजिक क्रांतीचे जनक छत्रपती राज्यर्षी शाहू महाराज
*************************
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य, तेवढ्याच
हिमकतीने छत्रपती संभाजी व राजाराम महाराजांनी सांभाळले, पुढे त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू व राजाराम राजेंची पत्नी ताराराणी यांच्यात स्वराज्यावर स्वतःचा स्वतंत्र दावा सांगताना गृहकलह सुरू झाला,त्याचा परिणाम म्हणून स्वराज्यात छत्रपतींचे दोन संस्थान निर्माण झाले एक म्हणजे सातारा व दुसरे नव्याने 1708 मध्ये निर्माण झालेले करवीर किंवा कोल्हापूर संस्थान,करवीर संस्थानचे छत्रपती शिवाजी महाराजांचे चौथे वारस ज्यांचे नाव ही शिवाजीचं होते,त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना मुलगा नसल्यामुळे गादीला वारस राहिला नाही म्हणून त्यांच्या पत्नीने संस्थान मधीलच एका मंत्र्याचा मुलगा यशवंत जयसिंग घाडगे ज्यांचा जन्म कागल येथे 26 जून 1874 ला झाला होता त्याला दत्तक पुत्र घेतले व त्याचे छत्रपती शाहू असे नामकरण करून त्याला वारसदार म्हणून गादीवर बसवले.
कोल्हापूर संस्थांनचे दृष्ट्ये राजे म्हणून शाहू महाराजांची पुढे ओळख निर्माण झाली.उदार
मतवादी व सुधारणा मतवादी असलेल्या या खऱ्या लोकराजाला
माहिती होते की आपल्या प्रजेचे हित नेमक्या कोणत्या गोष्टी केल्याने साध्य होणार आहे,
सामाजिक न्याय हा शब्द फक्त म्हणण्यापूरता न राहता खरा सामाजिक न्याय आपल्या कृतीतून दाखवून देणारा,छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला त्यांच्या विचारांचा खरा वारसा प्रत्येक्ष आचरणातून सिद्ध करणारा शाहू महाराज एक आदर्श राजा होता.
शाहूंचे शिक्षण देश विदेशात झाल्यामुळे त्यांच्या कामात आधुनिकता व दूरदृष्टीचा प्रभाव दिसून येतो, शिक्षण व ज्ञानाशिवाय कुठल्याही देशाचा विकास होऊ शकत नाही हे मर्म त्यांनी ओळखले होते,समाजात त्याकाळी मोठ्या प्रमाणात असलेली जातीयवादी अस्पृश्यतेची विषमता जर कायमची संपवायची असेल तर सर्वांनीच शिक्षण घेतले पाहिजेच हा आग्रह त्यांचा होता म्हणूनच संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं त्यांनी केलं,मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपया दंड त्यांनी लावला होता,शैक्षणिक क्रांतीचे खरे जनक असलेल्या शाहू महाराजांनी सर्वच बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली त्यासाठी लागणारे शाळा,कॉलेज,वसतिगृह
याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली.सवर्ण व अस्पृश्यतेतील
मुलांसाठीची वेगवेगळी शाळा भरण्याची असलेली पद्धत त्यांनी बंद केली,स्वतंत्र अनेक शिक्षण संस्था काढून संस्कृत,तंत्रिकी शिक्षण व लष्करी प्रशिक्षण केंद्र सुरू केले,दिगंबर जैन,वीरशैव लिंगायत, मुस्लिम,मराठा,नामदेव,
पांचाळ ब्राम्हण,ख्रिश्चन,ढोर चांभार,आर्य सुतार,नाभिक व दिव्यांग अशा विविध जाती धर्मातील शिक्षण घेण्यासाठी
आलेल्या मुलांची राहण्याची सोय व्हावी म्हणून जातीनिहाय वसतिगृह त्यांनी सुरू केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत ही शाहू महाराजांनी केली,
गंगाराम कांबळे या महार
जातीतील माणसाला कोल्हापूर येथे चहाचे हॉटेल टाकून दिले व स्वतः आपल्या लाव्याजम्यासहीत
तिथे चहा पिण्यास जाऊ लागले व सगळ्या दलितांनाच उद्योग करण्यास प्रोत्साहीत केले.महार
मांग,जोशी,बेरड इत्यादी गुन्हेगारी जमात ठरविलेल्याना रोज चावडी वर जाऊन हजरी देण्याची पद्धत त्यांनी बंद केली व सर्वधर्म
समभाव ही भावना कायम जण सामान्यांच्या मनात जागृत ठेवली.
सर्वच जाती समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नौकऱ्यात त्यांना राखीव जागा ठेवून खऱ्या अर्थाने आरक्षणाचे
जनक शाहू महाराज हेच होते.
महार वतनाची अमानुष पद्धत त्यांनी बंद केली,आंतरजातीय व विधवा पुनर्विवाह हा कायदा त्यांनी केला,देवदासी सारखी कृपथा त्यांनी बंद करून त्यांना त्यांच्या पित्याच्या संपत्तीत वाटा दिला तसा प्रतिबंधात्मक कायदाच तयार केला,हिंदू कायद्यात सुधारणा करून संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळवून दिला.सार्वजनिक ठिकाणी कसल्याही प्रकारची अस्पृश्यता पाळली जाऊ नये यासाठी कडक नियम तयार केले.
गावातील पारंपरिक असलेली कुलकर्णी वतने रद्द केली व गाव कारभार करण्यासाठी तलाठी हे सरकारी पद निर्माण केले.मराठा
जातीतील तरुणांना ब्राह्मणेत्तर पुरोहित होण्यासाठी शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना त्यांनी केली.
गोवंश बंदी कायदा केला,
सिंचनासाठी स्वतंत्र पाटबंधारे धोरण निश्चित करून त्याचे स्वतःचे वेगळे खाते निर्माण केले
शेतकऱ्यांसाठी सिंचनाचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व वीज निर्मिती साठी जगासाठी आश्चर्य असलेले राधानगरी नावाने मोठे धरण त्यांनी बांधले,आपल्या भागात चहा,रबर व कॉफीची शेती करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवला,
उसाच्या रसापासून गुळ तयार करून तो गूळ बाजारात विकण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
शाहूपुरी व जयसिंगपूर या मोठ्या व्यापारी पेठा त्यांनी सुरू केल्या,
सहकारी कायदा तयार करून त्यावर सहकार निंबधक हे सरकारी अधिकारी पद त्यांनी निर्माण केले.सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरू केली,औषध निर्माण, मधुमक्षिका पालन,सुती कापड उद्योग,कोल्हापुरी चपला इत्यादी उद्योगांना त्यांनी चालना दिली.संस्थानात जिनिंग फॅक्टरी,
ऑइल मिल,मोटार वाहन उद्योग सुरू केले, कोल्हापूर ते मिरज ही पहिली रेल्वे सेवा सुरू केली.भटक्या जनावरांसाठी निवारा व घोडयासाठी सोनसळी येथे स्वतंत्र पागा तयार केल्या.
शाहू महाराज हे शरीराने उंच व धिप्पाड होते, त्यांना स्वतःला व्यायाम व कुस्तीची खूप आवड होती म्हणूनच त्यांनी कोल्हापुरात मोतीबाग तालीम व कुस्तीसाठी सर्वात मोठ्या अशा खासबाग मैदानाची उभारणी केली,स्वतः कुस्तीपटू असल्यामुळे कोल्हापूर ची शाहूमय मल्लविद्या सर्व भारतात प्रसिद्ध झाली व कुस्ती या खेळाचे पिशिंदे म्हणून शाहू महाराज यांचे नाव सगळ्या खेळाडू पर्यंत पोहचले,कुस्ती या खेळाबरोबरच त्यांनी कलेलाही राजाश्रय मिळवून दिला,गायन समाज,देवल क्लब वा अन्य सांस्कृतिक कला सादर करणाऱ्या कलाकारांना त्यांनी मोठी मदत केली,चित्रकारांचा सन्मान केला.
विजयी मराठा,जागृत व भगवा झेंडा या वृत्तपत्र चालकांना ते प्रसारित करण्यासाठी मदत त्यांनी केली.वेठबिगारी पद्धत बंद करून आर्य समाजाची स्थापना त्यांनी केली,दलित अस्पृश्य परिषदेला बळ देऊन त्याचे अध्यक्ष असलेल्या डॉ.आंबेडकरांचा गौरव त्यांनी केला.शाहू महाराजांचे कार्य बगून केम्ब्रिज विद्यापीठाने
त्यांना एल.एल.डी.ही पदवी बहाल केली,अखिल भारतीय कुणबी परिषदेने त्यांना राजर्षी या नावाने संबोधले,शाहू महाराजांना
48 वर्षाचेच अल्पायुषी जीवन लाभले, या कमी आयुष्यात दूरदृष्टी लाभलेला,समाजातील सर्व घटकांना समान न्याय देणारा
समाजसुधारक ते शेवटच्या श्वासापर्यंत रयतेच्या भल्यासाठी झटणाऱ्या या राजाला राजर्षी म्हणणे अगदी सार्थ ठरते.
त्यांनी सांगितलेला पुरोगामी विचार व त्यांनी तसेच राबविलेल त्यांचे धोरण यालाच प्रमाण मानून पुढे सगळ्या देशाला ते मान्य करावं लागले, अशा या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू
महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!
----------------------------------------


stay connected