Mothers Day Wish - Mom Day
आई
आई,तू समोर प्रकटावी
तुझ्या मिठी नित्य विसावे
अन् प्रेमाच्या ग स्पर्शाने
धुंद मन अलगद मोहरावे..
शोषून अमाप त्रास
दिला जन्म आम्हास
तूच मौलिक विश्वास
जिथे तेथे तुझा अभास..
माझे जीवन काय हेच मला मुळी समजत नाही.विरह हा माझ्यासाठी नवा नाही ग.पण,तुझ्या नसण्याने किती दरी निर्माण झाली.मनाने पूर्ण पुन्हा खचले.संकटांचा सामना करण्याचे बाळकडू बालपणापासून झेलतच आले ग.किती मनात वेदना असल्या तरी ओठांवर नित्य हसूच ठेवले अन् ठेवणार.तुला ही माहिती तुझी माया अजून तीच आहे,जिला तू जन्म दिला.पदोपदी तुझी आठवण येते.माझा एक प्रश्न,तू मला नेहमी हसताना दिसते,नटताना दिसते,फिरताना दिसते,मग माझ्या समोर का येत नाही? तूच,
करे कठीण प्रसंगी नेतृत्व
तुझ्यामुळे मला अस्तित्व
अनमोल, अमाप मातृत्व
घडवते,फुलवते व्यक्तित्व..
आई या शब्दात जादू आहे,उच्चारता सर्व मनातील वादळे शांत होतात,एक अनामिक ऊर्जा प्राप्त होते.आत्मा + ईश्वर या दोन शब्दांच्या निर्मितीत तुझे अस्तित्व आहे.आई रुपी आशिर्वाद नित्य सर्वांच्या संगती रहावे हा आशिष दिला.पण,देवाला तो ही पाहवला नाही,त्याने अचानक तुला आमच्यापासून दूर नेले.आज ५ महिने झाले ग तुझ्याविना आम्ही कसे जगतो.कामात असताना थोडे मन शांत राहते.अन् निवांत क्षणी मग,तुझी आठवणीतले प्रत्येक क्षण समोर येतो.इतकी शांत,अबोल,प्रसन्न मूर्ती तुझी.गोरीपान काया....तुझे रूप आम्हाला मिळाले नाही..पण तुझे प्रेम तर मिळाले.मुलगा मुलगी भेद कधी आपल्या घरी जाणवलाच नाही.मी हट्टी, तापट,स्पष्ट,रोखठोक बोलणारी.तुझ्या सोबत खोड्या करतांना किती हसायची तू..किती गुदगुल्या होत तुला....तुझ्या मनातले तू सर्व बोलत..पण,तू काही तरी लपवले माझ्या पासून असेच मला का वाटते? तुझी स्वप्न तू मला सांगितली नाही.एक स्वप्न सांगितले फक्त बाकी २_३ स्वप्ने सांगितली च नाही..नंतर सांगते बोलली..नंतर बोलली नकोच सांगायला.तुला घ्यायला मी शाळा करून येणार होते ना? मग,त्या पूर्वी च तू निरोप का घेतला? मला साधे भेटावे ही वाटले नाही तुला.बाई ची तू कधी मम्मी झाली..अन् नंतर आई...समजलेच नाही ग.तुला सर्वत्र फिरवायचे होते.नातवांना तुला मोठे झालेले पहायचे होते,त्यांचे लग्न,नातवंडे तुला अंगाखांद्यावर खेळवायचे होते ना?अग,मी रजा टाकून येतच होते ना? आपल्या रोजच्या गप्पा, आण्णाही तयार झालेत किती आनंदाने सांगितले होते.रात्रीतून असे काय घडले....भूक लागली तेव्हा,तू खाल्ले ही...मग आमच्या प्रेमाच्या भुकेने तुला थांबावे का वाटले नाही ग?
तुझी बेड नित्य नजरेसमोर येते.जीव कासावीस होतो.रात्रंदिन मग झोप येत नाही.आसवांना किती ही वाट मोकळी करून दिली तरी ते आपोआप येतात ग.बस,तुझी छत्रछाया हवी.सगळेच मला असे सोडून जातात,काय म्हणावे याला.अरुण नंतर तू ही गेलीस.जिवाभावाची माणसे असायला भाग्य लागतात असे म्हणतात? मग माझे भाग्य उज्ज्वल नाही का ग? तुझी मायेची ऊब नको का मला?माणसांच्या गर्दीत राहून ही एकटे एकटे वाटते.सारे चेहरे स्वार्थी वाटतात? काय होतेय? ते ही समजत नाही? खूप चीड चीड होते? शांती कधी लाभेल मला? मीच चिर निद्रा घेईल तेव्हाच का ग? असे,किती दिवस चालायचे.रोजचे दिवस मोजून मोजून थकले.काय स्वप्ने रंगवली होती पण एक ही स्वप्न पुरे झाले नाही? अन् त्यात माझे हातचं मला असे सोडून जावू लागले.तर काय करणार मी?
असे वाटतात माझ्या आयुष्यात काही तारखा येवूच नये.ज्या तारखांनी माझ्या जीवनात काळोख आणला.जीवनाचे किती पान पलटले तरी असेच का होते? तेच समजत नाही?तू लढायला शिकविले,स्पष्ट बोलायला,सत्य बोलायला शिकविले त्याच शिकवणी मी अंगी बाळगते.पण,या जगात ढोंगी लोकच जास्त भेटली.विश्वास टाकून काही उपयोग झाला नाही.आई-बाप असे एकमेव स्थान आहे जेथे सर्व मन रिते करता येते.पण,तुझ्या नंतर आण्णा स्पष्ट बोलत नाही ग.त्यांच्या मनातले आम्हाला काहीच समजत नाही.आम्हाला इतके पोरके वाटते तर आण्णाची काय अवस्था असेल ,विचार ही करू शकत नाही.तरी आमच्यासाठी तोंडावर हसू आणतात.त्यांची खूप काळजी वाटते.संसार किती कठीण वलय आहे.त्यांच्याजवळ जावे तर इकडे मुले काय करतील.अन् इकडे आण्णा यायला ही तयार होत नाही.तुझ्यासाठी तरी ते इकडे येत.तुझ्या आनंदासाठी ते सर्व काही करत.तुला खूप कष्ट झाले हे ते चांगले जाणून होते,म्हणून त्यांनी नेहमी तुला आनंदी ठेवण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला.मी प्रत्येक वेळी तुला म्हणायचे,तू भाग्यशाली आहेस..तुला आण्णा पती म्हणून लाभले.अन् त्यांना ही म्हणत तू त्यांना पत्नी म्हणून लाभली..जिने तुमचा इतका मोठा परिवार सांभाळला..सगळ्यांना प्रेम साखळीत बंदिस्त केले.कोणाला दुःख होवू दिले नाही. आमचे काका,आत्या,मावशी सगळे आपल्याकडेच आनंदाने येत,राहत त्यामुळे च ना.
माझ्यामुळे ,आक्का, स्वाती,भाऊ मुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला.आमच्या आजारपणात तर तुझी किती ओढाताण होत.सारे सारे आठवते.आठवणीची शिदोरी च आता सोबतीला ग.तू माझ्या संगतीला आहेस असेच वाटते..पण तू दिसावी,तुझ्या संगती मी भटकावे,रमावे असे मला नेहमी वाटतं.तुझ्या संगती खोड्या करायला मला फार आवडतं.आता असे हक्काचे,माझे हट्ट पुरवणारा हातचं मला कोठे सापडेना.आण्णा ,आम्हा सर्वांना जपतात.त्यांच्या डोळ्यात तू दिसते,तुझे प्रेम दिसते,त्यांची धडपड जाणवते..खूप एकटे वाटतात.पण,ते खूप स्वाभिमानी आहेत..याचा मला नेहमी गर्व आहे.माझ्या प्रत्येक संकटात तुम्ही धैर्याने उभे राहिलात.माझे ही मुले असेच संगतीला राहिले की मी सारे मिळविले.मुलांच्या सुखात आपले सुख असते.हे अनुभवले....तू अशी बिनधास्त कधी भांडली नाही,ओरडली नाही, रागावली नाही,रुसली नाही ग? का ग? तू नेहमी हसरी दिसायची..तुझे नाजूक,गुलाबी,मुलायम ओठ त्यांचे मला नेहमी कौतुक असायचे.मी नेहमी म्हणायचे असे माझे ओठ हवे होते.
आई,तू आम्हाला पहात असणार,आमची काळजी तुला असणार.तू आता कसली ही काळजी करू नकोस.पण,आमची अशी साथ सोडू नकोस? असे अचानक जाणे...नाही पटले ग? सहन नाही झाले? देवाचे अन् माझे भांडण आहे....मला जे आवडतात,तेच त्याला का आवडते?असा दूरावा निर्माण करून काय मिळविले.उन्हाळी सुट्टी असून मी अजून माहेरी नाही...काय सांगू,कसे सांगू,किती बोलू,काय मांडू,काय मनात ठेवू,काय काय करू काही सुचत नाही.तुझी भोळी भाबडी माया कोण करणार ग तुझ्या मायावर.आज मातृदिन म्हणून नाही तर आज १४/५/२३ ग...१४/१२/२२ ला आमचे जग च या विधात्याने हिरावून नेले.काय बोलू मग? मन हलके ही होत नाही..तेज,साक्षी साठी हसण्याचा प्रयत्न करते ,पण मन माझे अजून भूतकाळात डोकावते.सगळे समजते पण,वळत नाही ना.आपली भेट नक्की होईल? त्यावेळी तरी तू मिठीत घे.तुझ्या मांडीवर डोके ठेवून झोपणे,माझ्या डोक्याची मालिश करून देणे..किती हळवा स्पर्श होता.आता मी आले की तुझी वेणी घालून देत..तुला किती आनंद होत.तुला न सांगता,तुझे केस मी कापले तरी न रागवता फक्त बोलली इतके नव्हते ग कापायचे...मीच उलट रागावले त्यात काय झाले....अजून कापायचे होते..पण नाही कापले.तुला मेहंदी लावून देणे,दिवाळीला तुला तयार करणे..किती रूप तुझे खुलायचे ग...हिरव्या साडीत तर देवी स्वरूप...आहेच तू आमच्या घरची लक्ष्मी...अन् होतीच.आण्णा ना तू साथ दिली म्हणून आम्ही शिकू शकले..तुझ्या हात शिलाई वर आपले घर चालायचे. पहिली ते सातवी पर्यंत आमचा अभ्यास तूच घेतला.कामाची वाटणी करून द्यायची.. सम समान न्याय असायचा.मज्जा येत ग..सारे दिवस परतून येतील का?
stay connected