जनावरे चोरणारी टोळी ग्रामस्थांनी पकडली
शेतकऱ्यांच्या गोठ्यातून दावे तोडून गायी चोरून इतरत्र विक्री करण्याच्या उद्देशाने घेवून जाणाऱ्या पाच जणांच्या टोळीतील ३ जणांना जागरूक ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून चोप देत पोलीसांच्या हवाली केले. पारनेर तालुक्यातील रायतळे येथे ही घटना घडली.
पकडलेल्या चोरट्यांकडून त्यांनी चोरलेल्या २ लाख किंमतीच्या ४ गायी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडून १ अशोक लेलंड कंपनीचा पीकअप टेम्पो, २ तलवारी, १ कोयता अशी हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. या वेळी ग्रामसुरक्षा यंत्रणेचा वापर प्रभावी ठरला आहे.
बाबासाहेब जयसिंग काळे (वय २२, रा. टाकरवण, ता. गेवराई, जि. बीड), सुरेश यमाजी वाळके (वय २०, रा. लोणी, ता. आष्टी, जि. बीड), चाचा पाशा भोसले (वय ६०, रा. सय्यदमिर लोणी, ता. आष्टी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले ओहत.
या प्रकरणी अर्जुन दिनकर येणारे (रा. अस्तगावरोड, रायतळे, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. मंगळवारी (दि. १६) पहाटे १ वाजेनंतर संशयित काळे व त्यांचे साथीदार असे एकुण पाच संशयित येणारे यांच्या घराजवळील गोठ्यातून चार गायींची बांधलेली दावी तोडून त्यांना गुपचूप घेऊन जात होते..
गायींचा आवाज आल्याने जागे झालेल्या येणारे यांना हा चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांना जागे केले. गावचे उपसरपंच अंकुश रोकडे यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या या 18002703600 या टोल फ्री नंबर वर गावाला संदेश दिला. काही वेळातच हा संदेश एकाच वेळी संपूर्ण गावाला गेल्याने सर्व गावकरी जागे झाले आणि त्यांनी सर्वांनी चोरट्यांचा पाठलाग करून त्यातील तिघांना पकडले त्यांना बेदम चोप दिला.
तो पर्यंत सुपा पोलिस ठाण्यातील रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस उपनिरीक्षक पवार, सहाय्यक फौजदार सुनिल कुटे, चालक पो. कॉ. सुरेश मुसळे हे तेथे पोहचले. त्यांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी रायतळे शिवारात उभा केलेला अशोक लेलंड कंपनीचा पीकअप टेम्पो, २ तलवारी, १ कोयता अशी हत्यारेही काढून दिली. पोलिसांनी ती जप्त केली आहेत. या तिघांच्या विरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३९५ सह आर्म अॅक्ट ४ / २५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
stay connected