आ.सुरेश धस खरीप आढावा बैठकीत पालकमंत्र्याकडे या मागण्यांसाठी आग्रही.
***********************
पीक नुकसान भरपाई,शेती पंप वीज जोडण्या,मंजूर असलेली रोहित्रे,आष्टी रेल्वे स्टेशन येथे "रॅक पॉईंट "मंजूर करावा या केल्या मागण्या...
***************************
आष्टी (प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीमध्ये आमदार सुरेश धस यांनी आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानी बाबत भरपाई, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडण्या तसेच आवश्यक तेथील रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) बसवणे या मागण्यांसह रासायनिक खतांसाठी परळी येथील रेल्वे रॅक पॉईंट बदलून आष्टी,पाटोदा, शिरूर तालुक्यातील शेतकरी आणि दुकानदार यांच्या सोयीसाठी आष्टी रेल्वे स्टेशन हा रॅक पॉईंट मंजूर करावा या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्या मंजूर करण्यासाठी बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे आमदार सुरेश धस यांनी प्रभावी पद्धतीने मागण्या केल्या असून पालकमंत्र्यांनी या सर्व मागण्यांबाबत अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच या मागण्यांची पूर्तता होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी खा.प्रीतमताई मुंडे,आ.लक्ष्मण पवार,आ.प्रकाश सोळंके, आ.नमिता मुंदडा,जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जेजुरकर यासह विविध खाते प्रमुख, पदाधिकारी,अधिकारी खरीप हंगाम नियोजन बैठकीस उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या या आढावा बैठकीतील इतर विषयांबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी सप्टेंबर 2022 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात सतत झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आष्टी तालुक्यातील उर्वरित आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी 75 कोटी रुपये पाटोदा तालुक्यातील चार मंडळातील शेतकऱ्यांसाठी 59 कोटी रुपये आणि आष्टी मतदार संघातील शिरूर तालुक्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाई रक्कम 30 कोटी रुपये आणि एकूण बीड जिल्ह्यातील नुकसान भरपाईची 402 कोटी रुपये रक्कम तात्काळ मिळावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
महावितरण कंपनीकडे ज्या शेतकऱ्यांनी शेतीपंपासाठी वीज जोडणीसाठी कोटेशन्स भरलेली आहेत. त्यांना 31 मे पूर्वी वीज जोडणी करून द्यावी आणि आष्टी,पाटोदा, आणि शिरूर तालुक्यातील जिल्हा नियोजन समिती निधीद्वारे मंजूर करण्यात आलेले ट्रांसफार्मर्स 31 मे पर्यंत बसवावीत ज्यामुळे शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने आणि सुरळीत वीजपुरवठा होईल. याबाबत पालकमंत्र्यांनी संबंधित अधीक्षक अभियंता यांना तात्काळ आदेशित केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यानुसार वीज उपकेंद्रांची जोडण्यात येणाऱ्या सौरऊर्जा पॅनेल साठी खाजगी शेतकऱ्यांना 1 लक्ष 25 हजार रुपये प्रति हेक्टरी भाडे देण्यात येणार असल्याची जाहीर केले आहे. या योजनेबाबत महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा देखील आमदार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकरी आणि खत विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी रेल्वे रॅक पॉईंट हा परळी वैजिनाथ येथील असून आष्टी तालुक्यातील काही गावांपासून हे अंतर 250 किलोमीटर असून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील काही गावांसाठी 200 किलोमीटर अंतर असल्याने खताच्या विक्री दरात वाढ होते आणि खत मिळण्यासाठी ज्यादा वेळ लागतो त्यामुळे अहमदनगर ते आष्टी रेल्वे सेवा सुरू झाल्याने परळी वैजनाथ ऐवजी आष्टी रेल्वे स्थानक हा रॅक पॉईंट मंजूर करावा याबाबत रेल्वे मंत्रालय यांच्याशी संपर्क साधावा यासाठी पालकमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडे विनंती केली आहे. आष्टी हा रॅक पॉईंट आष्टी पाटोदा,शिरूर तालुक्यातील शेतकरी आणि दुकानदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच युरिया या खताची शेतकऱ्यांनी मागणी केल्यास दुकानदार या युरिया खताबरोबर इतर लिंकिंग साहित्य खरेदी करण्याची सक्ती करतात हे चुकीचे असल्याबाबत आमदार सुरेश धस यांनी आवाज उठवला आणि नॅनो युरिया हे खत वापरावे यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी जोरदारपणे प्रतिपादन केले. तसेच बायो फर्टीलायझर वापराबाबत देखील जनजागृती करण्यात यावी अशी मागणी केली शेतीची मशागत केल्यानंतर शेतकरी पाऊस थोडाफार जरी पडला तरी बियाणे पेरणी करण्याची घाई करतात हे बियाणे बीज प्रक्रिया केलेले नसल्यामुळे पिकांवर अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते.त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनच बीज पेरणी करावी याबाबत देखील मोठ्या प्रमाणावर जनजागृतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.वेळप्रसंगी बीज प्रक्रिया ही सक्तीची करण्यात यावी असेही आग्रही प्रतिपादन केले.
आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये रासायनिक खतांची आवश्यकता निर्माण होते त्यावेळी टंचाई होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळीच सावधानता बाळगून आष्टी तालुक्यासाठी कडा,धामणगाव, पिंपळा, दौलावडगाव आणि आष्टी येथे प्रत्येकी 200 मॅट्रिक टन म्हणजेच एकूण 1000 मॅट्रिक टन, पाटोदा तालुक्यासाठी 500 मॅट्रिक टन आणि शिरूर तालुक्यासाठी 500 मॅट्रिक टन रासायनिक खतांचा बफ्फर स्टॉक उपलब्ध होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अशीही आग्रही मागणी आमदार सुरेश धस यांनी या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्र्यांकडे केली आहे..पालकमंत्र्यांनी देखील या सर्व मागण्या शासनाकडून मंजूर करण्यात येतील असे आश्वासन दिल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे...
stay connected