पुलवामा हल्ल्या ला मोदी सरकार जबाबदार - माजी राज्यपाल सत्यपाल मलीकांचा आरोप

 पुलवामा हल्ल्या ला मोदी सरकार जबाबदार - माजी राज्यपाल सत्यपाल मलीकांचा आरोप




मागील काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात अनेक खळबळजनक विधाने केली जात आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी सावरकरणाबद्दल केलेल्या विधानावरून राजकारण तापलेले असताना आता माजी राज्यपालांनी थेट केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका केली आहे. अशातच आता जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोठा दावा करत सांगितले की, पंतप्रधानांना मी सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे. यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावरच्या पुलवामा भागात सीआरपीएफच्या जवानांच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. एका कारमध्ये असलेल्या सुसाईड बॉम्बरने थेट जवानांच्या ट्रकला धडक दिली. यामध्ये तब्बल ४० CRPF जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभर संताप उसळला होता. याच हल्ल्याच्या संदर्भात सत्यपाल मलिक यांनी केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सत्यपाल मलिक यांच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सत्यपाल मलिक सदर दावा करताना पाहायला मिळत आहेत.

पुलवामा हल्ला झाला, त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांनी या मुलाखतीमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले आहे. सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. कारण एवढा मोठा ताफा कधीही रस्त्याने जात नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांनी मागणी केली. राजनाथजींकडे मागणी केली. पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते. कसेही करून दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे.

तसेच पुलवामा हल्ला झाला, त्या दिवशी पंतप्रधान मोदींशी झालेल्या संवादाबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे. मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितले की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडले आहे. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, तर हे घडले नसते. तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही आत्ता शांत राहा, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. यावर आता भाजपा नेमकी काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.