*कडा येथे भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान*
कडा: येथे भगवान महावीर स्वामी यांच्या २६२२ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवार दिनांक ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वा. प्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे 'आयुष्यावर बोलू काही' या विषयावर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती समस्त जैन संघाच्या वतीने देण्यात आली. भ. महावीर स्वामींनी संपूर्ण जगाला 'जिओ और जिने दो' हा दिव्य संदेश दिला असून हा दिवस अहिंसा दिन म्हणून गौरविला जातो. त्यामुळे या दिवशी भ. महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ता. 3 एप्रिल रोजी सायंकाळी ८ वा. पुणा येथील प्रसिद्ध मधुर गायक श्री अनुप जैन यांचा भक्तीसंध्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच मंगळवारी सकाळी कडा शहरामधून भ. महावीर स्वामींच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक (शोभा यात्रा) काढण्यात येणार आहे. त्यानंतर जैन स्थानक कडा येथे महावीर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर श्री योगेशकुमार सुमतीलाल भंडारी यांच्यावतीने सर्वांना महाप्रसादाचे (गौतम प्रसादीचे) आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सायंकाळी प्रा. गणेश शिंदे यांचे महावीर चौक कडा येथे जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलविणारे सुश्राव्य असे व्याख्यान आयोजित केलेले आहे. तरी या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त जैन समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
stay connected