*शेतक-यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करावे*
सन २०२२-२०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतक-यांनी ज्या ठिकाणी कांदा विक्री केला आहे, त्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांचेकडे ३ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे पणन संचालक यांनी केले आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये, खाजगी बाजारामध्ये, थेट पणन अनुज्ञप्तीधारकांकडे अथवा नाफेडकडे १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये कांदा विक्री केलेल्या प्रत्येक शेतक-यांना प्रति क्विंटल ३५० रुपये व जास्तीत जास्त २०० क्विंटलच्या मर्यादेत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तरी राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांनी कांदा अनुदान योजना सन २०२२-२३ चा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कृषि उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन परवानाधारक, नाफेड खरेदी विक्री केंद्र तसेच जिल्हा उपनिबंधक, तालुका उप तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात विनामुल्य प्राप्त करुन घ्यावेत.
अर्जासोबत कांदा विक्रीची मुळपट्टी, कांदा पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, आधार कार्डची झेरॉक्स प्रत, सातबारा उतारा वडीलांच्या नावे व विक्री पट्टी मुलाच्या अथवा अन्य कुटुंबियांच्या नावे असल्यास अशा प्रकरणात सहमती असणारे शपथपत्र आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तरी शेतक-यांनी २० एप्रिलपर्यंत आपले अर्ज कांदा विक्री केलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्तीधारक, नाफेड खरेदी केंद्र प्रमुख यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केले आहे.
stay connected