देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार केव्हा ? महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक !

 देशातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार केव्हा ?
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक !





संदीप जाधव / प्रतिनिधी -

मराठवाडा, विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचा नेहमीच मुद्दा केला जातो. त्यावर राजकारणही भरपूर होते मात्र शेतकरी आत्महत्येत घट होताना दिसत नाही. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत कालावधीत देशात १६ हजार ८५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात सर्वाधिक ७ हजार ८८७ शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्याखालोखाल कर्नाटकात तीन हजार ५७३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहे.






विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा पुढे केला जातो. मात्र, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस असा कोणताही कृती कार्यक्रम आखला जात नाही. मागील तीन वर्षांत मोठी घट अपेक्षित असताना या आकडेवारीत फारसा बदल झाला नाही. महाराष्ट्रात २०१९ मध्ये दोन हजार ६८०,२०२० मध्ये दोन हजार ५६७ तर २०२१ मध्ये दोन हजार ६४० तर देशात २०१९ मध्ये पाच हजार ९५७, २०२० मध्ये पाच हजार ५७९ तर २०२१ मध्ये पाच हजार ३१८ शेतकऱ्यांनी जीवन संपविले.

सन २०२१मध्ये शेतकरी, शेतमजूर यांच्या मिळून १० हजार ८३३ आत्महत्या झाल्या. सन २०१९पासून कृषिक्षेत्रातील आत्महत्यांमध्ये प्रत्यक्ष जमीन मालकांचे प्रमाण किंचित उतरणीला लागत असून, भूमिहीन शेतमजुरांचे प्रमाण वाढते आहे. सन २०१९मध्ये चार हजार ३२४ शेतमजुरांनी जीवन संपविले. हा आकडा दोन वर्षांत, म्हणजे २०२१मध्ये पाच हजार ५६३ वर गेला. कोणताही व्यवसाय असला, तरी वैवाहिक कलह, व्यसनाधीनता, मनोरुग्णता या कारणांनीही आत्महत्या होतात. अशा वेळी, सगळ्यांच आकड्यांमध्ये वाढीचे सरासरी सातत्य हवे. आत्महत्यांमधील शेतमजुरांचा वाढता आकडा हा कृषी उत्पन्नाचे नवनवे विक्रम करणाऱ्या कृषिक्षेत्राची दुसरी बाजू दाखविणारा आहे. यातील अनेक कर्जबाजारीही असू शकतात.


स्वत:ची जमीन नाही; पण दुसऱ्याची कसायला घेतली आणि त्यातही अपयश पदरी आले, असेही अनेक शेतकरी जीवनाकडे पाठ फिरवून निघून गेले. देशातल्या एकूण आत्महत्या आणि अपघाती मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक नेहमीच पहिला राहिला आहे. महाराष्ट्रासारख्या विकसित म्हणवून घेणाऱ्या राज्यावरचे हे लांच्छन आहे. हजारो स्वयंसेवी, बिगरसरकारी संस्था व संघटनांचेही हे घोर अपयश आहे. त्यातल्या त्यात दिलासा म्हणजे, अपघातांची संख्या वाढती असली, तरी अपघाती मृत्यूंबाबत उत्तर प्रदेश व तमिळनाडू ही दोन राज्ये महाराष्ट्राच्या पुढे गेली आहेत. एकूण आत्महत्यांमधील महाराष्ट्राचा पहिला क्रमांक मात्र कायम आहेच. त्यात अर्थातच, शेतकरी, शेतमजूर आणि रोजंदारीवरचे कामगार यांच्या वाढत्या संख्येचा मोठा वाटा आहे. ब्यूरोला आकडेवारी तयार करताना 'रोजंदारीवरचा कामगार' अशी वर्गवारी सोयीसाठी करावी लागली असेल; पण हे जीवन संपविणारे हजारो तरुण; तसेच शेतमजूर वर्षभरात नेमके किती दिवस काम करीत होते, किती काळ बेरोजगार राहिले होते किंवा त्यांना त्यांच्या कामाचा पुरेसा मोबदला मिळत होता का, याचीही खोलात जाऊन तपासणी करावी लागेल. समाधानाची बाब म्हणजे, 'नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो'सारख्या राष्ट्रीय संस्था अजून तरी प्रामाणिक आकडेवारी देशासमोर ठेवतात .

एक हजार आत्महत्या- मराठवाड्यात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या एक वर्षाच्या कालावधीत १ हजार २३ शेतकरी आत्महत्या झाल्या. त्यात पात्र प्रकरणे ही ८४४ होती तर अपात्र प्रकरणे १३९ राहिली तर ४० प्रकरणे प्रलंबित आहे. नवीन वर्षात जानेवारी महिन्यात तब्बल ६२ शेतकऱ्यांनी जीवन संपविले. यामध्ये १२ प्रकरणे पात्र ठरली तर ५० प्रकरणांची चौकशी केली जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.