राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार शेतीपंपांचा विजपुरवठा खंडीत करू नये - भाई शिवाजी सुरवसे
आष्टी ( प्रतिनिधी ) -राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार शेतीपंपांचा विजपुरवठा खंडीत करू नये अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई शिवाजी सुरवसे यांनी जिल्हाधीकारी बीड यांच्याकडे केली आहे .
आष्टी विधानसभा मतदार संघात शेतकऱ्यांनी यंदा अनेक प्रकारची पीके घेतली आहेत, मुख्यत्वे भाजीपाला अशा पिकाची लागवड केली जात आहे. तसेच दिवसेंदिवस ऊन जास्त प्रमाणात तापत आहे. त्यामुळे दर तिसऱ्या दिवशी पिकांना पाणी द्यावे लागत आहे. मात्र वीजबिल थकबाकीच्या नावाखाली महावितरण कंपनी यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित करण्यास सुरुवात केली आहे. कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यावर पाण्याअभावी शेतातील पिके सुकत चालली आहेत. मानवाला जिवंत राहण्यासाठी अन्नधान्याची गरज आहे व अन्नधान्य उत्पादन हे शेतकरी शेतात पीक लावून करीत असतात व शेतीचे संपूर्ण उत्पादन हे पाण्यावरती आहे त्यासाठी विजेची आवश्यकता आहे, वीजेअभावी परिणामी अन्नधान्याचे अपेक्षित उत्पादन होऊ शकणार नाही त्यामुळे देशातील नागरिकांची अन्नसुरक्षा धोक्यात येईल. अन्नधान्य उत्पादनामध्ये व निर्याती मध्ये आपला भारत देश एक महासत्ता निर्माण होण्याकडे वाटचाल करत आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा स्थापन करून अन्नधान्याचे उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन देत आहे. दुसऱ्या बाजूला महावितरण कंपनी शेतीपंपाचे वीजबिल थकीत असल्याने वीजपुरवठा खंडित करत आहे. तरी आपणास विनंती वीज नियामक आयोग यांना तसेच वीज महावितरण कंपनी यांनी शेतकऱ्यांनी वीज बिल भरले नाही म्हणून वीजपुरवठा खंडित करू नये याचा पूर्ण परिणाम उत्पादन क्षमतेवर होईल व अपेक्षित असे दर्जेदार उत्पादन होणार नाही परिणामी संपूर्ण अन्नसुरक्षा धोक्यात येईल व राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाला हरताळ फासला जाईल.
तरी वरील सर्व गोष्टींचा विचार करून विजतोडणी तात्काळ थांबावी व आपल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव सुरवसे यांनी जिल्हाधीकारी बीड यांना निवेदनाद्वारे केली आहे . या प्रकरणी औरगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही तेजवार्ताशी बोलताना ते म्हणाले .
stay connected