ज्ञानदेव पांडूळे हे समाजभान असणारे कार्यकर्ते : प्रा. सुशीला मोराळे. ज्ञानदेव पांडूळे यांना कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान.

 ज्ञानदेव पांडूळे हे समाजभान असणारे कार्यकर्ते :  प्रा. सुशीला मोराळे.
ज्ञानदेव पांडूळे यांना कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान. 




अहमदनगर (प्रतिनिधी) : “शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे शेतकरी, कामगार कष्टकरी व गोर गरीबांच्या भल्यासाठी अधुरे राहिलेले काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्ञानदेव पांडूळे सारख्या  समाजभान असणाऱ्या कार्यकर्त्याला कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार देऊन त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम शब्दगंधने केले” असे प्रतिपादन बीड येथील सामाजिक  कार्यकर्त्या प्रा. सुशीला मोराळे यांनी केले. 

शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. हमाल पंचायत चे राज्य सल्लागार कॉ. बाबा आरगडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास आ. संग्रामभैय्या जगताप,सोलापूर येथील प्रा.कॉ.तानाजी ठोंबरे, माजी आ. दादाभाऊ कळमकर,कॉ.स्मिता पानसरे, ज्ञानदेव पांडूळे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे,संस्थापक सुनील गोसावी आदी मान्यवर यावेळी विचारपिठावर उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना प्रा. सुशीलाताई मोराळे म्हणाल्या की,  “डाव्या चळवळीतील कार्यकर्त्याचा दृष्टीने प्रेरणा, प्रोत्साहन व ऊर्जा देणारी ही कृती असून शब्दगंध च्या कार्यकर्त्यांनी योग्य व्यक्तीची निवड केली आहे.” सध्या देशात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या मनुवादी व फॅसिष्ट प्रवृत्तीवर त्यांनी आपल्या भाषणातून जोरदार हल्ला चढवला.

आ. संग्रामभैय्या जगताप म्हणाले की, ज्ञानदेव पांडूळे यांनी गेल्या ३०-४० वर्षांपासून हमाल पंचायत, शेतकरी, कष्टकरी, कामगार व झोपडपट्टी वासियांसाठी अनेक समाज हिताची कामे केली.नगरपालिका, रयत शिक्षण संस्था, स्काऊट गाईड अशा अनेक पातळीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम केले. त्यांच्या या कार्याची शब्दगंध ने या पुरस्काराच्या रूपाने दखल घेतली. व त्यांचा गौरव केला. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. 

कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या, कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर देशातील आणि राज्यातील त्यांचा विचार संपला नाही किंवा क. पानसरे ही संपलेले नाहीत. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक पानसरे तयार झाले. आणि त्यांचे विचार सर्वदूर पोहचविण्याचे काम चळवळीतील कार्यकर्ते करीत आहेत.

प्रा.कॉ.तानाजी ठोंबरे म्हणाले कि, “साहित्य हे समाज परिवर्तनासाठी उपयुक्त असणारे हत्यार आहे. सध्याच्या भयावह वातावरणात एक विशिष्ठ भूमिका घेऊन काम करण्याची गरज असते. अशा परिस्थितीत शब्दगंध ने स्वतःची एक ठाम भूमिका घेऊन हे धाडस दाखवलं व बहुजनांना एकत्र करीत रस्त्यावर उतरून लढाई करणाऱ्या ज्ञानदेव पांडूळे सारख्या माणसाचा शोध घेऊन त्यांना कॉ. गोविंद पानसरे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार दिला.” 

यावेळी आ. दादा भाऊ कळमकर, व कॉ. बाबा आरगडे यांचीही भाषणे झाली. शब्दगंध चे खजिनदार भगवान राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थापक सुनील गोसावी यांनी प्रास्ताविक केले. शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अशोक कानडे यांनी आभार मानले.शाहीर भारत गाडेकर यांनी गायिलेल्या महाराष्ट्र राज्य गित गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानदेव पांडूळे यांना कॉ. गोविंद पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास ॲड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. कारभारी उगले, अड्ड सुभाष भोर,प्रा.मेधा काळे,मधुसूदन मुळे,अड्ड.सुधीर टोकेकर,अजयकुमार साळवे,प्रा.जयंत गायकवाड,युनूसभाई तांबटकर,प्राचार्य विस्वास काळे,लेविन भोसले, हिराचंद ब्राह्मणे,धुळे येथील प्रभाकर सूर्यवंशी,तुकाराम कन्हेरकर,रावसाहेब झावरे,विजय बेरड,नगरसेवक प्रकाश भागानगरे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजेंद्र चोभे, राजेंद्र फंड, डॉ. तुकाराम गोंदकर,डॉ. अनिल गर्जे, सुभाष सोनवणे, सुनिलकुमार धस, बबनराव गिरी,स्वाती ठुबे, राजेंद्र पवार,प्रा.डॉ.संजय दवंगे,हरिभाऊ नजन आदींनी परिश्रम घेतले. 

फोटो ओळी :- ज्ञानदेव पांडूळे यांना कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करताना प्रा.कॉ.तानाजी ठोंबरे, प्रा.सुशिलाताई मोराळे, आ. संग्रामभैय्या जगताप, माजी आ.दादाभाऊ कळमकर, कॉ. स्मिता पानसरे, कॉ. बाबा आरगडे व इतर. (छाया :- ऋषिकेश राऊत)




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.