"लोक कल्याणकारी राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज "
********************
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच आराध्य दैवत नाहीत तर संपूर्ण हिंदुस्थान चे आराध्य दैवत आहेत माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहचता येते याचे एकमेवअद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत.
खर म्हणजे राजेशाही व्यवस्था संपुष्टात आलेली असताना आजच्या या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदोउदो का व्हावा?त्या राजाच्या विचारात,व्यवहारात आणि चारित्र्यात असे काय अनुकरणीय आहे की त्याची आठवण आपल्यासाठी कायमच स्फूर्तिदायक ठरावी.शिवाजी महाराज हे वारसा परंपरेने झालेले राजे नव्हते त्यांनी स्वबळावर स्वतःचे राज्य निर्माण केले होते,ते लोक कल्याणकारी राज्य संस्थापक होते.शिवाजी महाराजांचे राज्य रयतेला आपले स्वतःचे राज्य असे वाटत होते कारण राज्य स्थापनेचा मुख्य उद्देश महाराजांचा सर्व 'रयतेस पोटास लावणे 'हा होता राज्य स्थापनेवेळी महाराजांनी आपल्याबरोबर निष्ठावंतांची मांदियाळी तयार केली होती.राज्यातील अठरा पगड जातीतील लोक या स्वराज्याच्या कामाला लागली पाहिजेत हा उदात्त हेतू महाराजांनी ठेवला होता त्यासाठी त्यांनी अलौकीक लोकसंग्रह,अफाट लोकसंपर्क ठेवला होता माणस ओळखण्याची त्यांची कला,सृजनशीलता व निर्मितीक्षमता या अंगीभूत असलेल्या त्यांच्या गुणांमुळेच त्यांनी स्वतःच्या बळावर संपूर्ण स्वराज्य बनवलं.स्वराज्य म्हणजे माझं राज्य असे इथल्या प्रत्येक व्यक्तीला वाटले पाहिजे असे महाराजानां अभिप्रेत होते.
महाराजांची प्रत्येक गोष्टीत जिज्ञासावृत्ती होती, ज्ञान प्राप्त करण्याची प्रचंड ओढ त्यांना होती ते सांगत कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक गोष्टीचे ज्ञान मिळवा कारण ज्ञानासारखी दुसरी श्रीमंती या जगात नाही,ज्ञान मिळवताना प्रसंगी आपले पद प्रतिष्ठा बाजूला ठेवा.कर्तृत्व हे हातावरच्या रेषेत नाही तर भविष्य हे मनगटाच्या बळावर घडविता येते हा सगळ्यात मोठा विचार महाराजांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिला. अवघ्या पन्नास वर्षाचे आयुष्य महाराजांना मिळाल व एवढ्या कमी कालावधीमध्ये 110 किल्ले स्वतः बांधून 350 किल्ल्यांचे विस्तृत साम्राज्य त्यांनी उभा केल, सम्राट चंद्रगुप्त नंतर स्वतःचा आरमार उभा करणारा हिंदुस्थानचा पहिला राजा शिवाजी महाराज हे होते,आजही भारतीय नौदलाच्या प्रवेश द्वारावर लिहले आहे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज.साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सांगितले होते महाराष्ट्राला धोका जमिनीवरून नाही तर खरा धोका हा समुद्रातुन आहे व त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे मुंबईचा 26-11 चा आतंकवादी हल्ला होय.शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती ठरले होते कारण देशातील मिर्झा राजे जयसिंग व अफजल खान सोडता महाराजांना आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही,मोगल,इंग्रज, पोर्तुगल, डच अशा अनेक परकीय बलाढ्य सत्तेबरोबर लढा द्यावा लागला होता.
शिवाजी महाराजांचे कार्य हे आपले कार्य आहे असे त्याकाळी जनतेला वाटत होते महाराज जे काही करत आहेत ते आपल्यासाठी करत आहेत ही ठाम भावना त्यांच्या मनात होती म्हणून महाराजांसाठी अनेक मावळे मरायलाही तयार होते व त्यातल्या काहींनी त्याकामी आपल्या प्राणाची आहुती ही दिलेली आपल्याला पाहायला मिळते महाराजांच्या राज्यात राजाचा व जनतेचा थेट संपर्क आला जनतेला राजा सहज भेटू लागला,रयतेचा छळ त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून अठरा पगड जातीची राजा काळजी करू लागला त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला, लोक कल्याणकारी धोरणामुळे राज्य रयतेला आपले वाटू लागले.वतनदार व जमीनदारांची अन्ययी व्यवस्था महाराजांनी मोडून काढली कर पद्धत बंद केली दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढून शेतीसाठी त्यांना मदत जाहीर केली शेतकऱ्यांची व शेतीची विशेष काळीजी त्यांनी घेतली, पाण्याचे योग्य नियोजन केले.
शेतकऱ्यांना शेती बरोबर आपलं स्वराज्य या भावनेने त्याच्या संरक्षणासाठी प्रसंगी तलवार चालविण्यास ही शिकवली,शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर सरंजामशाहीत
गोरगरिबांच्या स्त्रीयांच्या अब्रूला काही किंमत नव्हती,राजे,राजवाडे,वतनदार,
जामीनदार,देशमुख,पाटील यांच्या दृष्टीने स्त्रीया म्हणजे उपभोगण्याच्या वस्तु होत्या महाराजांच्या काळात रांझा च्या वतनदार पाटलाने शेतकऱ्याच्या तरुण मुलीवर उचलून नेऊन बलात्कार केला मुलीने नंतर स्वतःचा जीव दिला महाराजांना ही बातमी कळल्यानंतर त्यांनी रांझा च्या पाटलाच्या मुसक्या आवळून त्याचे हात पाय कलम करण्याची त्याला शिक्षा दिली गरीब रयतेच्या पोरीची अब्रु घेतली म्हणून वतनदार पाटलाला जबर शिक्षा झाल्याचे पाहून रयत राजावर फिदा झाली राजाच जर रयतेच्या रक्षणासाठी काम करत असेल तर त्याच कामासाठी मग रयत मारायला ही तयार झाली.
स्त्रीयांची इज्जत कायम राहीली पाहिजे मग ती स्त्री कोणाचीही असो ही शिवाजी महाराजांनी कायम भूमिका घेतली.मुसलमान शत्रूची सुंदर व देखणी सून पाहून आई ची आठवण यावी अन 'आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते' असे उद्गार निघावेत यासाठी चारित्र्यसंपन्नता व सौंदर्या संबंधी असा निरोगी दृष्टिकोन फक्त शिवाजी महाराजकडेच होता.
महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विजयदुर्ग येथे आरमार साठी लागणाऱ्या जहाज बांधणीचा कारखाना काढला होता त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता होती त्याकाळी जंगल व झाडेही मोठ्या प्रमाणात होती त्यात ही आंबे फणस झाडाची लाकडे विशेष कामाची होती पण राजांनी स्पष्ट आदेश दिले स्वराज्यातील ही झाडे रयतेची लेकरं आहेत त्यांना हात लावू नका अतिशय जीर्ण झालेलं किंवा कामातून गेलेले झाड याकामी वापरायचे ही झाडेच आपली खरी संपत्ती आहे.
गुलाम म्हणून विकले जाणारे स्त्री पुरुष यांच्या व्यापाराची पद्धत महाराजांनी जाणीवपूर्वक शिक्षा देऊन बंद केली.
शिवाजी महाराजांचे युद्ध हे कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नव्हते तर ते जनतेच्या सुखासाठी असणाऱ्या स्वराज्याचे होते हिंदू का मुसलमान हे महत्वाचे नव्हते तर राज्य महत्वाचे होते.शिवाजी महाराज यांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार,वतनदार,चाकर व महाराजांचे अंगरक्षकापासून ते अगदी मोठमोठ्या पदावर होते आरमार सारख्या महत्वाच्या प्रमुख पदावर दर्यासारंग दौलत खान होता,काझी हैदर,सिद्धी हिलाल इतर अनेक जण इतिहासात आपल्याला निष्ठावंत महाराजांचे सैनिक मावळे म्हणून सापडतील,शिवाजी महाराज जुलमी मुस्लिम राज्यकर्त्यांचे राज्य नाहीसे करायला निघाले असल्यामुळे स्वराज्यातील मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते,धर्माचा प्रश्न येथे नव्हता राज्याचा प्रश्न त्यावेळी महत्वाचा होता महाराजांनी हिंदू देवळा बरोबर अनेक मशीदीचा ही त्याकाळी जीर्णोद्धार केल्याचे दिसून येते.
महाराजांच्या राज्याभिषेक करण्यास त्याकाळी कर्मठ ब्राम्हणनी विरोध केला असला तरी शिवाजी महाराजांचे ब्राम्हण सहकारी बाजीप्रभू देशपांडे, अण्णाजी दत्तो,दत्ताजी त्रिंबक,त्रिंबकपंत डबीर इत्यादींनी स्वराज उभारणीच्या कामी महाराजांबरोबर निष्ठने काम केले.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यात बहुसंख्य साथीदार उचवर्णीय,सरदार, वतनदार,जामीनदार,पाटील,
देशमुख, निंबाळकर हे नव्हते तर ते खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होते,ज्या मावळ्यांच्या चिवटपणावर,त्यांच्या दृढ निष्ठतेवर व असीम त्यागावर शिवाजी महाराज जो अतुलनीय पराक्रम करू शकले ते मावळे म्हणजे अठरा पगड जातीचे सर्वसामान्य शेतकरी होते.
शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला मोठे केले व मग सामान्य माणसांनी शिवाजी महाराजांना मोठे केले.
शिवाजी महाराजांनी अंधश्रद्धा व चुकीच्या समजुतीना कायम विरोध केला प्रत्येक चांगल्या गोष्टीची,युद्धाची सुरुवात अशुभ समजल्या जाणाऱ्या अमावास्या च्या दिवशी केली व त्यात यश ही मिळवून दाखवले,मूल जन्मताना पालथे जन्माला येणे ही अशुभ घटना असती ही अंधश्रद्धा होती राजाराम महाराज जन्मताना पालथे जन्माला आले सर्व अशुभ समजून गप बसले पण त्यावेळी महाराज म्हणाले 'पुत्र पालथा जन्माला,तो दिल्ली पातशाही पालथी घालील' हा सकारात्मक विचार त्यांनी त्यावेळी रुजवला व श्रद्धेचा व अंधश्रद्धाचा वेगळा परिपाठ सर्वाना घालून दिला.
आज खऱ्या अर्थाने समाजसुधारणेसाठी तरुण पिढी घडविण्यासाठी शिवचरित्र जपण्याची गरज आहे शिवाजी महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांच्या विचारांना डोक्यात घेण्याची गरज आहे,आज आपण शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभा करण्याचे स्वप्न पाहत आहोत पण महाराजांनी दिलेला अमूल्य ठेवा असलेला गडकोट किल्ल्याकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत ही खेदजनक बाब आहे.
शिवाजी महाराजांच्या इतिहासात त्यांच्या विचारात,व्यवहारात,त्यांच्या कार्याच्या प्रेरनेत आजही आपल्या जीवनात उपयुक्त ठरेल असे बरेच काही आहे ते आपण समजून घेतले पाहिजे व ते अंगीकृत करून पुढे गेले पाहिजे त्यातून देश,समाज व स्वहीत साध्य केले पाहिजे हीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल किंबहुना शिवाजी महाराजांचा शारीरिक अंत जरी झाला असला तरी चारशे वर्षे झाली पिढ्यानं पिढ्या आपल्या सर्वांच्या मनात विचाराने ते जीवंत आहेत त्यांचे विचार आपण आपल्या जीवनात पेरले पाहिजेत तरच महाराजांची जयंती साजरी करण्याला अर्थ प्राप्त होईल.अश्या या जगमान्य आपल्या सर्वांच्या जाणत्या राजाला,देवपुरुषाला,खरे कुळवाडी भूषण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व शिवजयंती च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा....!!
----------------------------------------
stay connected