व्यथा बालकांची

 व्यथा बालकांची



कडकड हलगी वाजेल कानाशी, तुला ऐकून जाग येईल

सूर्य तापला नसेल म्हणून 

शीतल समजू नको त्याचे हे पहिले किरण असेल 

वाजणाऱ्या हलगी सोबत एक कोलांटी उडी घेऊन तू बांधलेल्या दोरीवर तोल सावरत चालायला तयार हो

बाळा बालदिन असला म्हणून काय?

 पोट उपवास सहन करणार नाही.....


तांबड फुटत असेल, गाडीवान जागले असतील

तू मात्र अजूनही जागा होत नसेल पण 

कानावर पडणारा

घुंगराच्या आवाजाने तुला फड दिसेल

आईने पदर खोवला असेल बापाने उपरणे बांधून 

कोयता हातात घेतला असे सपासप वार करून उसाला आडवे करणारा बाप आणि मोळी बांधणारी आई पाहून तुला वाढे गोळा करावे लागतील 

बाळा बालदिन असला म्हणून काय ?

पोट उपवास सहन करणार नाही.....


दूर वाजणारी शाळेची घंटा ऐकून 

तुला वाईट वाटू देऊ नको

तू आपली बैलाला झुल घाल गुमान

बापाने कमरेला बांधलेली ढोलक

आणि मायेने डोक्यावर घेतलेला पसारा पहा

आणि चल त्यांच्या मागे तू देखील मोठी थाळी घेऊन

भाकरी वाढ ग माय म्हणून आवाज दे दारोदार

आणि आई जोगवा मागेल गल्लीत 

तोवर बाप आहेच आपला गुबुगुबू

तुला मात्र दारोदार फिराव लागेल

बाळा बालदिन असला म्हणून काय ?

पोट उपवास सहन करणार नाही.....


चल आता हॉटेलच्या दारात,टेबल घे पुसायला

कोणी सेठ येईल ये बारक्या गरम चहा दे 

तो ही कडक मलई मारून ,ऐक तू हा साहेब म्हण

आणि ठेव टेबलावर साहेबांची ऑर्डर आणि हो

 जाताना गालावर गोड खळी पडूद्यावी

तुझ्या निरागस बालपणाची आणि साहेब टीप देतील म्हणून लाचार व्हावं तू अवघं बालपण पणाला लावून 

नाहीना दिले पैसे असो असुदे आपला टेबल पुसून घे 

बाळा बालदिन असला म्हणून काय ?

पोट उपवास सहन करणार नाही.....


चल बाळा सिग्नल तुझी वाट पाहतोय थांब 

लाल सिग्नल लागला असेल आणि ते पाहून 

तुझ्या मनात थांबलेली शाळा येईल दुःख करू नको

आपल्या देशात प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे 

असुदे तुला काय त्याच तू निरागस भाव प्रकट कर

चेहरा लाचार होऊदे ,हाताची वाटी कर आणि माग

पोटासाठी..

बाळा बालदिन असला म्हणून काय? 

पोट उपवास सहन करणार नाही......


बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🌻


*अमरवाणी*


अमर शांताई अर्जुन हजारे

9922214155

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.