संत शेख महंमद महाराजाचे साहित्य दुर्लक्षित राहणे म्हणजे दुर्दैवच : ह.भ.प. आटोळे
-------------------------------------
वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज जयंती साजरी
-------------------------------
संदिप जाधव/आष्टी
सोळाव्या शतकात बहुजन समाज अनिष्ट रुढी परंपराच्या जोखडात अडकलेला होता. या कालखंडात संत शेख महंमद महाराजांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर प्रबोधनपर साहित्य रचवनेतून हल्ला चढविला. अज्ञानाच्या गर्तेतून समाजाला दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र हिंदू - मुस्लिम समाजाच्या कलहात या महान संताचे विचार व साहित्य दुर्लक्षित राहिले, अशी खंत ह.भ.प. किसन आटोळे सर यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील श्रीक्षेत्र वाहिरा येथे संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानच्या वतीने समाधी मंदिरात जयंती उत्सवा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवचनपर सेवेत ते बोलत होते. जन्मोत्सवानिमित्त महाराजांच्या समाधीवर चादर चढवून पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज, अब्दुल महाराज, पांडूरंग गावडे, ह.भ.प. सोमनाथ मेटे महाराज, मोसीम महाराज शेख, सतिष चंदिले, सदाशिव पगारे, प्रविण आटोळे, नारायण आटोळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरी आणि अल्ला हे भिन्न नसून एकच आहेत. उगाच देवाधर्माच्या नावाखाली तेढ निर्माण केली जाते. याला समाजाने बळी पडू नये. त्यामुळे हिंदू - मुस्लिमांनी भांडत बसण्यापेक्षा सामाजिक एकोपा व शांतता राखून प्रगती व विकास साधावा असा थेट उपदेश अभंग रचनेतून संत शेख महंमद महाराजांनी दिला असल्याचे दाखले देत किसन आटोळे यांनी मांडणी केली.
नवस सायास करुन देवाकडून संपत्ती व धनाची अपेक्षा ठेवणार्यांना थेट मूर्ख म्हणून महाराजांनी संबोधले आहे. यातून महाराजांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन लक्षात घेतला पाहिजे असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ह.भ.प. सिध्दीनाथ मेटे महाराज म्हणाले.
सदाशिव पगारे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार
यावेळी संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचे सहसचिव सदाशिव पगारे यांची न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी येथून सेवानिवृत्तीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.


stay connected