🚜 आत्मा योजनेंतर्गत ‘शेतकरी मित्र’ निवडीसाठी मार्गदर्शक सूचना जारी

 

🚜 आत्मा योजनेंतर्गत ‘शेतकरी मित्र’ निवडीसाठी मार्गदर्शक सूचना जारी


मुंबई/बीड : आत्मा योजनेंतर्गत सन २०२६-२७ साठी ‘शेतकरी मित्र’ निवडीबाबत कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. शेतकरी, कृषी विभाग आणि गावपातळीवरील यंत्रणा यांच्यात महत्त्वाचा दुवा म्हणून शेतकरी मित्र काम करणार आहे. अनुभवी, प्रयोगशील आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना या भूमिकेसाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

१२वी उत्तीर्ण असणे आवश्यक

शेतकरी मित्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किमान २५ ते कमाल ६० वर्षे असावे. संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावचा रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारावर कोणताही गुन्हा दाखल नसावा आणि किमान १२वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. सोशल मीडिया हाताळण्याचे कौशल्य तसेच दररोज किमान दोन तास कृषी विभागाचे काम करण्याची तयारी आवश्यक आहे.

शेतकरी गट निर्मितीसह विविध जबाबदाऱ्या

शेतकरी मित्रांना गावांमध्ये FIG, CIG आणि FSG यांसारखे शेतकरी गट तयार करण्यास, त्यांची क्षमता बांधणी व सर्वेक्षण करण्यास मदत करावी लागणार आहे. नैसर्गिक शेती व शेतीशाळांसाठी लाभार्थी निवडणे, ग्रामसभेत सहभागी होऊन कृषी योजनांची माहिती देणे, कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे तसेच शेतकरी प्रशिक्षण व विविध कृषी योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी सहाय्य करणे ही त्यांची प्रमुख कामे असतील.

महिलांसाठी ३० टक्के सहभाग अनिवार्य

शेतकरी मित्रांच्या निवडीत ३० टक्के महिलांचा सहभाग अनिवार्य करण्यात आला आहे. यासाठी तालुक्यातील एकूण गावांपैकी ३० टक्के गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना आहेत. इच्छुक उमेदवारांनी संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे अर्ज सादर करायचा आहे.

सर्वाधिक शैक्षणिक पात्रतेनुसार निवड

प्राप्त अर्जांमधून सर्वाधिक शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवाराची निवड करण्याचे निकष आहेत. त्यानुसार पदव्युत्तर, पदवीधर, पदविकाधारक आणि त्यानंतर बारावी उत्तीर्ण असा प्राधान्यक्रम राहील. समान शैक्षणिक पात्रता असल्यास त्या पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.

निवड दोन वर्षांसाठी; कामगिरीवर पुढील वर्षाची सेवा

प्रत्येक मंजूर सहायक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडला जाणार असून निवड दोन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. मात्र पहिल्या वर्षानंतरच्या मूल्यांकनात ७५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या शेतकरी मित्राचीच सेवा पुढील वर्षासाठी सुरू ठेवली जाईल.

महिन्याला १,५०० रुपये मानधन

शेतकरी मित्रांना दरमहा १,५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८,००० रुपये मानधन देय राहणार आहे. याशिवाय कोणतेही अतिरिक्त मानधन, प्रवास खर्च किंवा इतर भत्ते मिळणार नाहीत. मानधन तीन महिन्यांचे एकत्रित करून वर्षातून चार टप्प्यांत देण्यात येणार असून रोखीने देयक करता येणार नाही.

बीड जिल्ह्यासाठी ४२३ शेतकरी मित्रांचे लक्ष्य

आत्मा योजनेंतर्गत जिल्हानिहाय निवड लक्ष्यामध्ये बीड जिल्ह्यासाठी ४२३ शेतकरी मित्र निश्चित करण्यात आले आहेत. पुणे विभागातील अहिल्यानगरसाठी ६२९, पुण्यासाठी ६१४ आणि सोलापूरसाठी ५३६ असे लक्ष्य देण्यात आले आहे. राज्यासाठी एकूण ११,५८७ शेतकरी मित्रांची निवड करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांपर्यंत कृषी योजनांची माहिती, आधुनिक तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार पोहोचविण्यासाठी ‘शेतकरी मित्र’ ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर