संत साहित्य=जीवनाचा खरा प्रकाश
===================
आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस पैशाच्या मागे धावत असताना आपल्या मनाचे समाधान हरवून बसला आहे. अशा वेळी संतांच्या विचारांची गरज अधिकच वाढली आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ या मंडळींनी दिलेला संदेश हा केवळ भक्तीचा नव्हता, तर तो माणुसकीचा, समतेचा आणि सेवेचा होता. त्यांनी सांगितले की "माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे". आज आपण एकमेकांवर अविश्वास ठेवतो, लहान-सहान कारणावरून भांडतो. संतांनी शिकवलेली सहनशीलता आणि क्षमा ही मूल्ये जर आपण अंगीकारली तर समाजातील तणाव नक्कीच कमी होईल. संतांचे विचार म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र आहे. ते आपल्याला लोभ, अहंकार आणि रागापासून दूर राहायला शिकवतात. शेतकऱ्याच्या घामाचा मान राखा, गरिबाला मदत करा, प्राणिमात्रांवर दया करा हेच त्यांचे सार होते. आज सोशल मीडियावर द्वेष पसरतो, पण संतांनी प्रेमाचा प्रचार केला. आपण जर त्यांचे अभंग वाचले, त्यांचे अर्थ समजून घेतले तर आपोआपच मन शांत होते. शिक्षणाबरोबर संस्कार देण्यासाठी शाळांमधून संत साहित्य शिकवणे गरजेचे आहे. तरुणांनी मोबाईल सोडून थोडा वेळ ज्ञानेश्वरी, गाथा हातात घ्यावी. घराघरातून "सर्वे भवन्तु सुखिनः" ही भावना रुजवली पाहिजे. शेवटी आठवण ठेवा, मोठे होणे सोपे आहे पण चांगले माणूस होणे कठीण आहे आणि ते संतच आपल्याला शिकवू शकतात. म्हणूनच काळ कोणताही असो, संतांच्या विचारांना कवटाळूनच आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो.


stay connected