भारत सरकारकडून डॉ. आशिषकुमार कटारिया यांना चौथे प्रॉडक्ट पेटंट; गांधी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा
कडा : श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ, कडा या शतकपूर्ती करणाऱ्या नामांकित शैक्षणिक संस्थेअंतर्गत कार्यरत गांधी महाविद्यालय, कडा येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ.आशिषकुमार पी.कटारिया यांना भारत सरकारच्या भारतीय बौद्धिक संपदा कार्यालयाकडून (Indian Patent Office) त्यांच्या संशोधनासाठी चौथे भारतीय प्रॉडक्ट पेटंट प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
"Novel N-Substituted-4-(3,5-Dimethylphenyl)Thiazol-2-Amine Compounds and Process for Synthesizing Thereof" या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंट मंजूर झाले आहे. हे संशोधन सेंद्रिय संश्लेषण (Synthetic Organic Chemistry) क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान मानले जात आहे.
डॉ. कटारिया हे सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री क्षेत्रातील उदयोन्मुख संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांचे संशोधन ChemistrySelect, Molecular Diversity, New Journal of Chemistry तसेच Polycyclic Aromatic Compounds यांसारख्या उच्च प्रभावांक (High Impact Factor) असलेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
आजपर्यंत त्यांनी ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन निबंध प्रकाशित केले असून, त्यांच्या सातत्यपूर्ण संशोधन कार्यामुळे रसायनशास्त्र आणि औषधनिर्मिती क्षेत्राला महत्त्वपूर्ण दिशा मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. कटारिया यांच्या नावावर आतापर्यंत चार प्रॉडक्ट पेटंट आणि एक डिझाईन पेटंट, अशी एकूण पाच पेटंट नोंद झाली असून, संशोधन क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे.
कमी वयात कठोर परिश्रम, सातत्य आणि संशोधनाची जिद्द यांच्या बळावर डॉ. आशिषकुमार कटारिया यांनी मिळवलेले हे यश युवा संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गांधी महाविद्यालय, कडा येथील प्राचार्य डॉ. जे. एम. भंडारी यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


stay connected