सोनखेडमध्ये संशयित कॅल्शियम साठ्यावर पोलिसांची धडक कारवाई; वाहनासह माल जप्त, गोदाम सील, परवानग्यांची चौकशी सुरू
सोनखेड | चंद्रकांत वाघमारे
लोहा तालुक्यातील सोनखेड येथे आवश्यक परवाने व वैध कागदपत्रांशिवाय मोठ्या प्रमाणात संशयित कॅल्शियमचा साठा आढळून आल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी सोनखेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत वाहनासह माल जप्त केला आहे. तसेच संबंधित गोदाम सील करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित माल उत्तर प्रदेशातील मेरठ येथून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ सोनखेड पोलीस तसेच पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच सोनखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोदामाची पाहणी करून UP 12 DT 8706 क्रमांकाचे वाहन ताब्यात घेतले. वाहनासह संशयित कॅल्शियमचा साठा जप्त करण्यात आला. तसेच गोदामातील उर्वरित माल सील करण्यात आला. याशिवाय गोदामात असलेल्या सुमारे दहा मोटारसायकलीही चौकशीच्या अनुषंगाने सील करण्यात आल्याची माहिती आहे.
संबंधित मालासाठी आवश्यक परवाने, वाहतूक कागदपत्रे, खरेदी-विक्रीची नोंद, साठवणुकीची वैध परवानगी तसेच इतर आवश्यक दस्तऐवज उपलब्ध आहेत का, याची पोलीस आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडून सखोल पडताळणी सुरू आहे.
प्राथमिक चौकशीत हा माल नेमका कोठून आणण्यात आला, कोणाच्या आदेशाने त्याची वाहतूक करण्यात आली, कोणत्या उद्देशाने त्याचा साठा करण्यात आला, संबंधित व्यवहारामागे कोणाचा सहभाग आहे आणि सर्व आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का, याचा सर्वंकष तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे. तपासात नियमभंग अथवा बेकायदेशीर बाबी आढळल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.
या कारवाईमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून, परराज्यातून येणाऱ्या संशयित मालाच्या वाहतुकीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.




stay connected