मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. अन्वर जमीरभाई सय्यद यांचा गौरव Tejwarta News Network 25 June 2026

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. अन्वर जमीरभाई सय्यद यांचा गौरव


Tejwarta


तेजवार्ता न्यूज नेटवर्क / मुंबई : विज्ञान, संशोधन व विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच भारतीय जैन संघटना (BJS) च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतील योगदानाबद्दल आष्टी तालुक्यातील धानोरा गावचे सुपूत्र डॉ. अन्वर जमीरभाई सय्यद यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नियतीचे चक्र’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

यावेळी BJS चे संस्थापक शांतीलाल मुथ्या , मॅनेजिंग डायरेक्टर विलास राठोड , अमृता देवेंद्र फडणवीस , कोमल जैन , प्राचार्य संतोष भंडारी , अशोक पवार आदी मान्यवर उपस्थित होते .
मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो.
डॉ. सय्यद यांनी पॉलिमर अभियांत्रिकी क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) (पूर्वाश्रमीचे यूडीसीटी - UDCT) मधून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते एल्के सिलिकॉन्स (Elkay Silicones) येथे सायंटिस्ट अँड असिस्टंट जनरल मॅनेजर (टेक्नॉलॉजी) म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी आदित्य बिर्ला समूहातील ग्रासिम इंडस्ट्रीज तसेच इतर नामांकित संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

सिलिकॉन्स, वस्त्रोद्योग, नैसर्गिक पॉलिमर्स आणि शाश्वत रसायनशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांना १८ वर्षांहून अधिक औद्योगिक संशोधन व विकास (R&D) अनुभव आहे. नवीन उत्पादन विकास, तंत्रज्ञान नेतृत्व, संशोधन संघ उभारणी आणि जागतिक नवोन्मेष कार्यक्रमांचे नेतृत्व करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. अमेरिका, मेक्सिको, कोलंबिया, फ्रान्स आणि चीन यांसारख्या देशांमधील संशोधन व तांत्रिक सहकार्य प्रकल्पांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला आहे.

पॉलिमर केमिस्ट्रीमधील अत्याधुनिक संशोधन, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान विकास आणि संशोधनाचे यशस्वी व्यावसायिकीकरण यामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. संकल्पनेपासून उत्पादनाच्या व्यावसायिक यशापर्यंत (Ideation to Commercialization) अनेक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून त्यांनी उद्योगक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सिलिकॉन संशोधन, वस्त्रोद्योग, वैयक्तिक देखभाल उत्पादने (Personal Care), कोटिंग्ज आणि विशेष रासायनिक अनुप्रयोग क्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण नवकल्पना साकारल्या आहेत. त्यांच्या संशोधनामुळे भारतीय रसायन उद्योग, वस्त्रोद्योग आणि प्रगत पदार्थ विज्ञान (Advanced Materials Science) क्षेत्रात तांत्रिक प्रगतीस चालना मिळाली आहे.

याशिवाय, भारतीय जैन संघटना (BJS) च्या विविध सामाजिक, शैक्षणिक, कौशल्य विकास आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून समाजहितासाठीही उल्लेखनीय योगदान दिले आहे. विज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्कृष्ट संगम साधल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
डॉ . अन्वर सय्यद यांचे इयत्ता ७वी पर्यंतचे शिक्षण धानोरा येथील जनता विद्यालयात झाले . पुढील शिक्षण पुणे येथील बीजेएस या संस्थेमध्ये झाले . जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सय्यद आयुब सर यांचे ते पुतणे व सय्यद असलम सर यांचे ते लहान बंधू आहेत . प्रा. कवी अल्लाउदीन सर यांचे भाचे आहेत . त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन जनता शिक्षण संस्थेचे सचिव विजयकुमार बांदल , अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई , माजी सभापती अंकुश चव्हाण , परमेश्वर काका शेळके , सरपंच सुभाष शेळके , भगवान गायकवाड , राजाभाऊ शेळके , अजिनाथ शेळके , नामदेवराव शेळके , नागेश शेळके , राहुल शेळके , माजी प्राचार्य राजू मास्टर , पत्रकार सय्यद बबलूभाई , डॉ सय्यद रज्जाक भाई , दादासाहेब उदावंत पोलीस , सय्यद जावेद भाई , सय्यद खालेद भाई , महादेव अडागळे , दादासाहेब गव्हाणे , बापुराव शेळके , सुरेश शेळके आदींनी अभिनंदन केले .
पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. सय्यद म्हणाले, "हा सन्मान माझ्या कुटुंबीयांचा, सहकाऱ्यांचा, मार्गदर्शकांचा आणि संशोधन क्षेत्रातील सर्व सहप्रवाशांचा आहे. विज्ञानाच्या माध्यमातून समाजोपयोगी, शाश्वत आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करून देशाच्या प्रगतीस हातभार लावण्यासाठी मी पुढेही प्रयत्नशील राहीन."


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.