माजी आ. भीमराव धोंडे यांना नवभारत मिडिया ग्रुपचा " महाराष्ट्र गौरव पुरस्कार " जाहीर, केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ७ जुलै रोजी दिल्लीत वितरण

 माजी आ. भीमराव धोंडे यांना नवभारत मिडिया ग्रुपचा " महाराष्ट्र गौरव पुरस्कार " जाहीर, 
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते ७ जुलै रोजी दिल्लीत वितरण




आष्टी ( वार्ताहर):- शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन राज्याच्या विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान हे अत्यंत प्रेरणादायी आहे. या कार्याचा गौरव व्हावा यासाठी नवभारत मिडिया ग्रुपच्या वतीने नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्र्यांच्या शुभहस्ते माजी आमदार भीमराव धोंडे यांना " महाराष्ट्र  गौरव पुरस्कार " देऊन सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती नवभारत मिडीया ग्रुपचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे यांनी निवड पत्राद्वारे दिली.

    याबाबत अधिक माहिती अशी की, नवभारत मिडीया ग्रुपचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे यांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांना दिलेल्या निवड पत्रात म्हटले आहे की, आपण विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन बीड जिल्ह्याच्या  व महाराष्ट्र राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. या कार्याचा होणारा गौरव अनेकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, असा आम्हाला दृढ विश्वास आहे तसेच आपण "विकसित भारत कॉन्क्लेव्ह २०४७" या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत निमंत्रण देण्यात आले आहे.

 "विकसित भारत कॉन्क्लेव्ह २०४७" हा भारताच्या विकसित राष्ट्राच्या संकल्पनेला समर्पित राष्ट्रीय स्तरावरील एक प्रतिष्ठित व महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. विकसित भारताच्या दिशेने देशाचा विकास प्रवास, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच सन २०४७ पर्यंतच्या सर्वांगीण विकासाच्या रोड मॅपवर या विशेष कॉन्क्लेव्हमध्ये सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये शासन, उद्योग आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्याच्या उ‌द्देशाने विविध क्षेत्रांतील मान्यवर, धोरणनिर्माते, उ‌द्योगपती, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच इतर प्रभावशाली व्यक्तिमत्त्वे सहभागी होणार आहेत. याच प्रसंगी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव करणाऱ्या महाराष्ट्र  गौरव पुरस्कार वितरण हा कार्यक्रम दिनांक ७ जुलै २०२६,सकाळी ११.०० वाजता, हयात रिजन्सी नवी दिल्ली येथे होणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी आमदार भीमराव धोंडे यांना महाराष्ट्र  गौरव हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील तसेच बीड जिल्ह्यातील अनेक मान्यवर तसेच कार्यकर्ते त्याचप्रमाणे नवभारत मिडीया ग्रुपचे सरव्यवस्थापक कल्याण पांडे, नवभारत मीडिया ग्रुप निवड समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.