आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश; राज्य रस्ता क्र. १६ साठी ₹९६६ कोटी मंजूर ग्रामस्थांनी अद्वैतचंद्र निवासस्थानी भेट देऊन व्यक्त केले आभार

आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नांना यश; राज्य रस्ता क्र. १६ साठी ₹९६६ कोटी मंजूर

ग्रामस्थांनी अद्वैतचंद्र निवासस्थानी भेट देऊन व्यक्त केले आभार





आष्टी (प्रतिनिधी)


अहिल्यानगर–बीड या महत्त्वपूर्ण राज्य रस्ता क्रमांक १६ च्या ९६ किलोमीटर रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने तब्बल ₹९६६ कोटींचा निधी मंजूर केल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ऐतिहासिक मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणल्याबद्दल मराठवाडाभूषण लोकनेते आमदार सुरेश धस यांचे आभार मानण्यासाठी रस्त्यालगतच्या विविध गावांतील ग्रामस्थ, शेतकरी, व्यापारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आष्टी येथील अद्वैतचंद्र निवासस्थानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.


मराठवाड्याच्या प्रवेशद्वारापासून सुरू होणारा हा महत्त्वाचा मार्ग टाकळी काझी, दौलावडगाव, पिंपरी, घाटा, कारखेल खुर्द, म्हसोबाचीवाडी फाटा, धामणगाव, सांगवीपाटण, डोईठाण, हातोला, अंमळनेर, डोंगरकिन्ही, गारमाथा, निरगुडी ते बीड असा जातो. या रस्त्याच्या सुधारणा व रुंदीकरणामुळे हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुखकर होणार आहे. तसेच व्यापार, शिक्षण, आरोग्य आणि दळणवळणाच्या सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत मिळणार आहे.


आमदार सुरेश धस यांनी आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे श्री संत वामनभाऊ नारळी सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना या रस्त्याच्या सुधारणेची मागणी प्रखरपणे मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळत तातडीने निधी मंजूर केल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार धस यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.


रस्त्याच्या विकासाला नवी गती


“१९९६ साली लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या रस्त्याच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर अनेक वर्षे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले. आता आमदार सुरेश अण्णा धस यांनी पुन्हा एकदा ₹९६६ कोटींचा निधी मंजूर करून या रस्त्याच्या कायापालटाचा मार्ग मोकळा केला आहे.”


 शत्रुघ्न (बापू) मरकड

सांगवी पाटण


*********************


 सुरक्षित प्रवासाची अपेक्षा


“बीड, अहिल्यानगर, पुणे आणि मुंबईला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने त्याचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. रस्त्याची दुरवस्था व धोकादायक वळणांमुळे अनेक अपघात झाले. गंभीर रुग्ण, गर्भवती महिला आणि अपघातग्रस्तांना वेळेत उपचारासाठी पोहोचवणे कठीण होत होते. आता रुंदीकरण व वळणांचे निर्मूलन झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल.”


— डोंगरपट्ट्यातील ग्रामस्थ


*******************


विकासाला चालना मिळणार


“मुंबई, पुणे व इतर शहरांमध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या युवकांना तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना या रस्त्याचा मोठा लाभ होणार आहे. दौलावडगाव ते उखांडा परिसरात विकासाची नवी आशा निर्माण झाली असून संपूर्ण भागात आनंदाचे वातावरण आहे.”


— अशोक गर्जे

सुरुडी


*************


 लोकनेत्याच्या कार्यपद्धतीचे कौतुक


“लोकनेता कसा असावा तर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखा आणि त्यांच्या विचारांतून घडलेला लोकनेता आमदार सुरेश धस यांच्यासारखा असावा. सामान्य माणसाच्या गरजा ओळखून विकासकामे पूर्ण करण्याची त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी आहे.”


— माऊली जरांगे

अंमळनेर गट





Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.