*पाटोद्यात लाखोंचा शेतीमाल घेऊन आडत व्यापारी पसार; शेतकऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव*
पाटोदा (गणेश शेवाळे ) पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पाटोदा येथील जयमल्हार ट्रेडिंग कंपनी (आडत दुकानचे) मालक संदीप रामराव नवले (रा. शिखरवाडी ता. पाटोदा जि. बीड) यांनी शेतकऱ्यांकडून सोयाबीन, हरभरा व इतर शेतीमाल खरेदी करून त्याचे पैसे न देता दुकान बंद करून पसार झाल्याने नफरवाडी, नागशवाडी,बेलेवाडी, वाघिरा, वैजाळा व इतर गावांतील शेतकऱ्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. संबंधित आडत व्यापारी गेल्या 8 ते 9 वर्षांपासून शेतीमाल खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. विश्वासावर शेतकऱ्यांनी त्याच्याकडे माल विक्री केला होता.शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, माल खरेदी करताना 10 ते 15 दिवसांत किंवा जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत पैसे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यासाठी पावत्या देखील देण्यात आल्या होत्या. मात्र, आता जवळपास महिनाभर उलटून गेला तरी व्यापारी संपर्कात नसून दुकान बंद आढळत आहे.शेतकऱ्यांनी वारंवार दुकानावर जाऊनही तो भेटला नाही. शेजारील दुकानदारांकडे चौकशी केली असता, दुकान एक महिन्यापासून बंद असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शेतकऱ्यांनी शिखरवाडी येथील त्याच्या मूळ गावी जाऊन चौकशी केली असता कुटुंबीयांनीही त्याच्या ठिकाणाबाबत अनभिज्ञता दर्शवली.या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आडत व्यापाऱ्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करावी तसेच प्रलंबित रक्कम त्वरित मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे


stay connected