अंभोरा पोलिसांचा चक्री जुगारावर धडाकेबाज छापा
------------------
मराठवाडीत कारवाई; ३ जण ताब्यात, ३२ हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त
------------------
कडा/ वार्ताहर
---------------
आष्टी तालुक्यातील मराठवाडी गावात बेकायदेशीर चक्री जुगाराचा डाव रंगात आला असतानाच अंभोरा पोलिसांनी अचानक छापा टाकत जुगाराच्या या अड्ड्यावर घाला घातला. दुपारच्या सुमारास झालेल्या या धाडसी कारवाईने गावात एकच खळबळ उडाली. पैशांच्या आकड्यांवर फिरणारा ‘चक्री’चा खेळ क्षणार्धात थांबला असून, पोलिसांच्या जाळ्यात तीन जण अडकले.
अंभोरा पोलिसांच्या या बेधडक कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच संगणकीय साहित्य-LCD, CPU, माऊस, कीबोर्ड- यांसह चक्री चार्ट आणि इतर जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३२,६९५ रुपये इतकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. ० ते ९ या आकड्यांवर पैसे लावून स्वतःचा फायदा करून घेण्याचा हा प्रकार उघडकीस आला.
सदर प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असून, पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
या कारवाईत फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे यांनी पुढाकार घेतला. तसेच आरोपी म्हणून अभिषेक हमपे, करण साबळे आणि अशपाक पठाण (सर्व रा. भिंगार, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही धाड यशस्वी करण्यासाठी सपोनि साळवे, पोउनि चंद्रकांत तावरे, पोह हरिभाऊ बांगर, पोह सुखदेव बांगर आणि पोशिं शिवदास केदार यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
------%-------


stay connected