महावीर चानोदिया यांची पुणे जिल्हा सीए संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

महावीर चानोदिया यांची पुणे जिल्हा सीए संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड




तेजवार्ता न्यूज नेटवर्क आष्टी (जि. बीड) 

– आष्टी तालुक्यातील धानोरा येथील उद्योजक कुटुंबातील युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले महावीर मिठूलाल चानोदिया यांची पुणे जिल्हा सीए (चार्टर्ड अकाउंटंट) संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली असून, त्यांच्या निवडीमुळे धानोरा परिसरासह संपूर्ण आष्टी तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.

महावीर चानोदिया हे कामधेनु उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक तसेच अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष कांतुशेठ चानोदिया यांचे पुतणे आहेत. व्यवसाय, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील परंपरा जपणाऱ्या या कुटुंबातील महावीर चानोदिया यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि नेतृत्वगुणांमुळे अल्पावधीतच वेगळी ओळख निर्माण केली आहे.



पुणे येथील गंगाधाम परिसरात झालेल्या पुणे जिल्हा सीए संघटनेच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. संघटनेतील सर्व सदस्यांनी एकमताने त्यांची अध्यक्षपदी निवड केल्याने त्यांच्या कार्यावर असलेला विश्वास स्पष्ट झाला आहे.

महावीर चानोदिया यांनी यापूर्वीही विविध व्यावसायिक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून, तरुणांमध्ये व्यावसायिक मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि उद्योगवृद्धी यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल आणि चार्टर्ड अकाउंटंट क्षेत्रातील विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



या निवडीबद्दल धानोरा, हिवरा, पिंपरखेड, सुलेमान देवळा तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत महावीर चानोदिया यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून, भविष्यातही ते समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.