*१४ वे अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर करिता.. श्री बाळासाहेब देशमुख "कथाकथन" साठी निमंत्रित
अहिल्यानगर :- अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे दिनांक २१ व २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होत आहे.
शेती साहित्य अभ्यासक माननीय ज्ञानदेव राऊत यांची संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
सदर साहित्य संमेलनामध्ये कथाकथन, कवी संमेलन , व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, सन्मान असे विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
सदर संमेलन मध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन कार्यक्रम साठी निवड झाल्याची माहिती अखिल भारतीय शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष ,सुप्रसिद्ध साहित्यिक गझलकार माननीय गंगाधर मुटे यांनी दिली आहे.
सदर संमेलनामध्ये कथालेखक बाळासाहेब देशमुख हे ' पापी पेट का सवाल है ' हा प्रयोग कथाकथन मध्ये सादर करणार आहेत. अवर्षणग्रस्त भागातील शेतकरी संकटात सापडतो. पोट भरण्यासाठी शहरात रसवंतीगृह चालविण्याचे काम करतो. संकटांची मालिका झेलत राहतो. पण अंगी असलेला कष्टाळूपणा, प्रामाणिकपणा, माणुसकी सोडत नाही. यावरती भाष्य करणारी कथा.. सादर केली जाणार आहे.
बाळासाहेब देशमुख यांचे आजवर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ४५० प्रयोग शाळा, कॉलेज, सभागृह, ज्येष्ठ नागरिक संघ, इत्यादी ठिकाणी संपन्न झालेली असून, राज्यस्तरावरील महाराष्ट्राच्या विविध भागात नांदेड , देगलूर , कोल्हापूर, आळंदी, पुणे, बीड, नाशिक, सातारा येथे राज्यस्तरीय संमेलन मध्ये पंचवीस प्रयोग पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या 'रंग माझा वेगळा' हा कथासंग्रह नुकताच अखिल भारतीय साहित्य महामंडळ अध्यक्ष मिलिंद जोशी यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला. दुसरा कथासंग्रह 'माणसे अशी.. अन् तशीही...' लवकरच प्रकाशित होत आहे.
सदर संमेलन युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, स्वराज्य मुकुटमणी , प्रतापगड परिसर ,दाभे मोहन, महाबळेश्वर , जिल्हा सातारा येथे होत आहे.


stay connected