परळी येथे “महा पशुधन एक्स्पो–२०२६” चे भव्य आयोजन
बीड | प्रतिनिधी
पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परळी वैजनाथ (जि. बीड) येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान “महा पशुधन एक्स्पो–२०२६” या राज्यस्तरीय भव्य पशुपालन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात विविध जातींच्या ३०० पेक्षा अधिक पशुधनाचे प्रदर्शन होणार असून पशुपालक, शेतकरी, उद्योजक व युवकांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान, दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढी पालन, कुक्कुटपालन तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे ३०० हून अधिक माहितीपूर्ण स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.
उद्घाटन व बक्षीस वितरण
या महाएक्स्पोचे उद्घाटन शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता
मा. ना. श्रीमती पंकजा प्रजा गोपीनाथ मुंडे, मंत्री, पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तसेच रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजता
मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
प्रमुख आकर्षणे
या एक्स्पोमध्ये गाय-म्हशी, शेळी-मेंढी, अश्व तसेच कुक्कुटपालन प्रदर्शन, पशुधन ड्रॉग शो, तांत्रिक चर्चा सत्रे, शेतकरी मार्गदर्शन व प्रश्नोत्तर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत गोवंश मूल्यवर्धन स्टॉल्सही या ठिकाणी असणार आहेत.
स्थळ
हा कार्यक्रम ओपन मैदान, वैद्यनाथ महाविद्यालयासमोर, अंबाजोगाई रोड, परळी वैजनाथ, जिल्हा बीड येथे पार पडणार आहे.
या राज्यस्तरीय पशुधन महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी आष्टी तालुक्यातील शेतकरी व पशुपालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ विष्णु साबळे यांनी केले आहे.


stay connected