शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा गुणवत्तेसोबतच सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शाळेने केले - सागर धस अनिशा ग्लोबल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न.

 शैक्षणिक,सांस्कृतिक,क्रीडा गुणवत्तेसोबतच  सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम शाळेने केले - सागर धस 
अनिशा ग्लोबल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न.







आष्टी (प्रतिनिधी) ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाची संकल्पना रुजविण्याचे स्वप्न पाहणारे वडील सुरेश अण्णा धस व आई प्राजक्ता धस यांच्या दूरदृष्टीतून अनिशा ग्लोबल स्कूलची स्थापना झाली.आष्टीसारख्या ठिकाणी आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा उभी करण्याचा त्यांचा निर्धार आज प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. स्थापनेपासून आजपर्यंत त्यांनी स्वतः वेळ देत, प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष ठेवत शाळेची धुरा समर्थपणे सांभाळली.शैक्षणिक गुणवत्तेसोबतच सांस्कृतिक, क्रीडा व इतर सहशालेय उपक्रमांमध्येही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी केले. प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांशी सुसंवाद ठेवत विश्वासाचे नाते निर्माण करण्यात शाळा देखील यशस्वी ठरली असून.या प्रवासात सर्व शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सर्व संचालक यांचा मोलाचा हातभार लाभला असल्याचे मत सागर धस यांनी व्यक्त केले.ते अनिशा ग्लोबल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी संस्थेच्या मार्गदर्शका प्राजक्ताताई धस,युवा नेते जयदत्त धस,ऐश्वर्या धस,ट्रस्टी

लक्ष्मण रेडेकर,थोरले महाराज,संजय मुळे

उगले मॅडम,सुखलाल मुथा,शाळेचे प्राचार्य अविनाश राऊत, तपन गौडा,क्षितिजा रामदासी आदी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी सजलेल्या या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवून उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, नाट्य व गीतांनी वातावरण भारावून गेले. विशेष आकर्षण ठरले ते छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोगाचे. संभाजी महाराजांना बंदी केल्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचारांचे आणि त्यांच्या निर्दयी हत्येचे दृश्य विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे साकारले. या प्रसंगाने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः शहारे आले. विद्यार्थ्यांच्या अभिनयकौशल्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि काही काळ स्तब्धता पसरली.

याचबरोबर भक्त प्रल्हाद आणि भगवान विष्णूंच्या नृसिंह अवतारावर आधारित गीत-नाट्य सादरीकरणाने धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जाणीव करून दिली. लहानग्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला विशेष दाद मिळाली.

इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर, पारंपरिक तसेच आधुनिक गीतांवर सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. आकर्षक वेशभूषा, नेटक्या हालचाली आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे प्रत्येक कार्यक्रमाला टाळ्यांचा कडकडाट लाभला.

यावेळी शाळेचे प्राचार्य अविनाश राऊत यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.पालकांनीही शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.एकूणच, अनिशा ग्लोबल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कला, आत्मविश्वास आणि संस्कारांचे सुंदर दर्शन घडवले. हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.