संत सेवालाल महाराज हे थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारी संत -----आमदार सुरेश धस

संत सेवालाल महाराज हे थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारी संत
-----आमदार सुरेश धस

*********************

संत सेवालाल महाराज जयंती २०२६ उत्साहात संपन्न; १३ तांड्यांचा उत्स्फूर्त सहभाग

*****************

आ. सुरेश धस यांनी बंजारा भाषेत उपस्थितांना संबोधले

********************






आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट लमाण तांडा येथे सद्गुरु सेवालाल महाराज जयंती २०२६ विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाली. तमाम गोर बंजारा बांधव तसेच तालुक्यातील १३ तांड्यांच्या वतीने आयोजित या सार्वजनिक जयंती उत्सवात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.

यावेळी आष्टी विधानसभेचे भाजप आमदार सुरेश धस म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे १८व्या शतकातील महान संत व समाजप्रबोधनकार होते. त्यांनी बंजारा समाजातील अंधश्रद्धा, मद्यपान, अन्याय व कुप्रथांविरुद्ध ठाम भूमिका घेत समाजाला शिक्षण, एकता व स्वाभिमानाचा मार्ग दाखवला. तांड्यांना स्थैर्य देणे, शेती व संघटनासाठी प्रेरणा देणे, स्त्रियांचा सन्मान राखणे तसेच जलसंधारण,प्राणीसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे ही त्यांची प्रमुख कार्ये होती. सत्य, नैतिकता आणि समाजहित यांवर आधारित जीवन जगण्याचा त्यांनी दिलेला उपदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे. “सद्गुरु सेवालाल महाराज हे थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारी संत म्हणून पूजले जातात,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

सावरगाव फाटा ते लमाणतांडा, देऊळगाव (घाट) या मार्गावर भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मूर्तीपूजन व भोग भंडारा पार पडला. बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविणारी पारंपरिक सांस्कृतिक नृत्ये सादर करण्यात आली.

आमदार धस यांनी बंजारा भाषेत संवाद साधत बांधवांशी आत्मीयतेने संवाद साधला. “शिक्षण, एकता आणि स्वाभिमान हा आपल्या प्रगतीचा खरा मार्ग आहे. संत सेवालाल महाराजांचे विचार आचरणात आणल्यास समाज अधिक सक्षम व सुसंघटित बनेल,” असे ते म्हणाले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित नसून सर्व समाजाचे दैवत आहेत. नागपूरला जाताना आपण आवर्जून पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे दर्शन घेतो व मुक्काम करतो. पोहरादेवी हे आपल्या सर्वासाठी काशीप्रमाणे पवित्र स्थान आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला असून विशेष निधी व महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. पोहरादेवीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र बनविण्याची दिशा देण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांनीच केले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या ठिकाणी आणून उद्घाटन केले आहे असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी रावसाहेब शिरसाट, अशोक इथापे, रमेश तांदळे, राजेंद्र मस्के, भरत जाधव, मोहन आमटे, बंडू तळेकर, बबलू शेठ कुरेशी, महादेव थोरात, नवनाथ गव्हाणे, अशोक दहातोंडे, संतोष वायभासे, सुरेश माळी, गणेश वायभासे, जावेद शेख, साबळे साहेब, गोटीराम कोहक आदी मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी जयंती उत्सवानिमित्त आमदार सुरेश धस यांच्या वतीने महापंक्तीचे आयोजन करण्यात आले. महाप्रसादासाठी महापंगत देत अन्नदाता म्हणून सेवा बजावण्यात आली. संत सेवालाल महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सामाजिक ऐक्य व परंपरेचा उत्सव ठरलेल्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.







आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांशी बंजारा भाषेत साधला संवाद



 संत जयंती सोहळ्यात आष्टी विधानसभेचे आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांशी थेट बंजारा भाषेत संवाद साधत आत्मीयतेने भाषण केले.

यावेळी भाषण करताना त्यांनी सद्गुरु सेवालाल महाराज यांच्या शिकवणीचा उल्लेख करत  आमदार सुरेश धस यांनी संत सेवालाल महाराजांचे उपदेश बंजारा भाषेत मांडत समाज बांधवांशी थेट संवाद साधला. त्यामुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मातृभाषेत संवाद साधल्याने समाजबांधवांमध्ये आत्मीयता आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ झाली.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.