धानोरा ZP शाळेच्या विद्यार्थ्यांची तेजवार्ता न्यूज नेटवर्क कार्यालयाला अभ्यासपूर्ण भेट Tejwarta News Network

 धानोरा ZP शाळेच्या विद्यार्थ्यांची तेजवार्ता न्यूज नेटवर्क कार्यालयाला अभ्यासपूर्ण भेट








आष्टी (प्रतिनिधी) :

आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या इयत्ता तिसरी ‘अ’ तुकडीच्या विद्यार्थ्यांनी, आज बुधवार दि. ३ डिसेंबर रोजी तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या कार्यालयाला एक अभ्यासपूर्ण क्षेत्रीय भेट दिली. कृतीशील व नाविन्यपूर्ण शिक्षक मयूर थोरवे सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.


या भेटीची सुरुवात विद्यार्थ्यांचे स्वागत करून करण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्सुकतेने वृत्तपत्राची रचना, बातमी तयार होण्याची प्रक्रिया, संपादन, हेडलाईन लेखन, फोटो निवड, तसेच न्यूज चॅनलचे दैनंदिन कामकाज प्रत्यक्ष पाहिले. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया कसे कार्य करतात याबाबतचे प्रत्यक्ष ज्ञान मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आश्चर्याचे भाव स्पष्ट दिसत होते.

Vdo पहा📽️📡📺👇



तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे संपादक बबलूभाई सय्यद यांनी सर्व विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत पत्रकारितेचे महत्त्व, बातमी कशी तयार होते, फिल्डवर रिपोर्टिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, सत्य आणि पडताळणी यांचे महत्त्व इत्यादी बाबी बालसुलभ भाषेत समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनीही निर्भीडपणे प्रश्न विचारत आपली जिज्ञासा व्यक्त केली. संपादकांनी त्यांच्या सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरे देत त्यांना योग्य मार्गदर्शन केले.


यावेळी सर्व विद्यार्थ्यांना तेजवार्ता दिवाळी अंक भेट स्वरूपात देण्यात आला. या विशेष भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता.


संपादक बबलूभाई सय्यद यांनी मयूर थोरवे सरांच्या या अभिनव शैक्षणिक उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करत सांगितले की,

“विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव दिल्यास त्यांच्या समजुती अधिक दृढ होतात. भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्यासाठी अशा संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या आहेत.”


शेवटी विद्यार्थ्यांनी तेजवार्ता कार्यालयातील ही अनुभवसंपन्न भेट अविस्मरणीय ठरल्याचे सांगत संपादक आणि कर्मचारी वर्गाचे व सर्व टिमचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.