केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आ.सुरेश धस यांनी घेतली भेट

 केंद्रीय मंत्री अमित शहा यांची आ.सुरेश धस यांनी घेतली भेट

****************************

आष्टी मतदारसंघातील ५० तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आ.धस यांचा पाठपुरावा

*****************************




****************************

आष्टी (प्रतिनिधी)

आष्टी विधानसभा मतदारसंघातील धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या प्रसाद योजना अंतर्गत विशेषबाब म्हणून निधी मंजूर व्हावा, यासाठी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथील संसद भवनात आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली.

      आष्टी, पाटोदा आणि शिरूर (कासार) तालुक्यांत असंख्य प्राचीन,ऐतिहासिक व श्रद्धास्थानांची परंपरा व पर्यटन लाभलेली तीर्थक्षेत्रे आहेत.दरवर्षी हजारो भाविक, वारकरी आणि पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र, अनेक तीर्थस्थळांवर रस्ते, स्वच्छता, पाणी, विश्रामगृहे, प्रकाशयोजना यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने त्यांचा अपेक्षित विकास झालेला नाही.ही बाब लक्षात घेऊन प्रसाद योजना (तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) अंतर्गत आष्टी मतदारसंघातील सुमारे ५० तीर्थक्षेत्रे व पर्यटन स्थळांना निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी आ.धस यांनी केली. याबाबत संबंधित विभागाकडून तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंतीही आष्टी मतदारसंघाचे आ.सुरेश धस यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे यावेळी केली.

     या निधीमुळे तीर्थस्थळांचा सर्वांगीण विकास होऊन भक्तांसाठी सुविधा वाढतील, धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असल्याने मतदारसंघातील भाविकांनी आभार मानले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.