कडा: अमोलक फार्मसी कॉलेजमध्ये GPAT व NIPER मार्गदर्शन सेमिनार संपन्न; ओम महाडिक यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन.
कडा, दि. 26 डिसेंबर:
येथील श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर येथे मंगळवारी 'GPAT व NIPER' या स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शनपर सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील उच्च शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयी सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली.
महाविद्यालयाच्या अमोलक सेमिनार हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सेमिनारचा मुख्य विषय “How to Prepare for GPAT and NIPER Examination” (GPAT आणि NIPER परीक्षेची तयारी कशी करावी) हा होता.
या सेमिनारसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून NIPER परीक्षा २०२४-२५ मध्ये अखिल भारतीय स्तरावर ४६ वी रँक (AIR 46) प्राप्त केलेले यशस्वी विद्यार्थी श्री. ओम महाडिक उपस्थित होते. त्यांनी आपले अनुभव कथन करताना विद्यार्थ्यांना यशाची गुरुकिल्ली सांगितली.
श्री. महाडिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचे सूक्ष्म नियोजन (Study Planning), प्रत्येक विषयाची सखोल तयारी (Subject-wise Preparation), वेळेचे अचूक व्यवस्थापन (Time Management) आणि परीक्षेची प्रभावी रणनीती (Exam Strategy) या महत्त्वाच्या पैलूंवर सविस्तर प्रकाश टाकला. कठीण संकल्पना सोप्या पद्धतीने कशा लक्षात ठेवाव्यात आणि परीक्षेच्या काळात तणावमुक्त कसे राहावे, यावरही त्यांनी मोलाच्या टिप्स दिल्या.
या सेमिनारमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेक विद्यार्थ्यांनी शंका विचारून आपल्या अडचणींचे निरसन करून घेतले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रातील आगामी स्पर्धा परीक्षांबाबत स्पष्ट दिशा मिळाली असून त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद गफ्फार यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक महेश क्षिरसागर यांनी केले तर महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. मोहसीन पठाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी डॉ. संजय गर्जे, प्रा. प्रशांत तांदळे, प्रा. स्नेहल लाड, प्रा. मनीषा जगताप,
प्रा. माया महाडिक, प्रा. वैष्णवी काटकर,
प्रा. किरण वाघमारे, प्रा. मिजबा तांबोळी,
निखिल कस्तुरे, अन्सार सय्यद, गणेश थोरवे, ऋषिकेश औंधकर, अमोल देसाई, अतुल जाधव, संजय शिरोळे, लखन शिरोळे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



stay connected