मराठवाड्यातील मदत मास,खिदमत मास जमिनींच्या मुद्यावरून आमदार सुरेश धस मुद्देसूद भाषणाने सभागृहाचे लक्ष वेधले
*******************************
********************************
आष्टी (प्रतिनिधी)
नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज आमदार सुरेश धस यांनी मराठवाड्यातील मदत मास आणि खिदमत मास जमिनींच्या मुक्ततेचा प्रलंबित प्रश्न मोठ्या जोरदारपणे मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
आमदार धस म्हणाले की, या महत्त्वपूर्ण विधेयकाद्वारे मराठवाड्यातील तब्बल ७,४३,००० हेक्टर मदत मास आणि सुमारे ४,५०,००० हेक्टर खिदमत मास जमिनींच्या मुक्ततेचा मार्ग मोकळा होत आहे.हा कोणत्याही एका मतदारसंघाचा किंवा तालुक्याचा प्रश्न नाही; संपूर्ण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील लाखो नागरिकांच्या जीवनाशी संबंधित विषय आहे असे ते म्हणाले.
जमिनींच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर भाष्य करताना त्यांनी निजामकालीन नोंदी, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी केलेल्या शिफारसी, तसेच विविध समाजांच्या विस्तृत जमिनी या नोंदींत कशा गुंतल्या गेल्या याचे स्पष्टीकरण सभागृहात दिले.
त्यांनी स्पष्ट केले की,मदत मास आणि खिदमत मास म्हणजे फक्त वक्फ किंवा मुस्लिम समाजाच्या जमिनी नव्हेत; मोठ्या प्रमाणात देवस्थानांच्या, हिंदू संस्थांच्या आणि विविध समाजांच्या जमिनीही या नोंदींमध्ये अडकल्या आहेत.
अनेक वर्षांपासून या प्रश्नावर सातत्याने केलेल्या पाठपुराव्यात त्यांच्यावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न, खोटे गुन्हे दाखल करणे आणि चौकशांची मालिका झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला. “प्रत्येक चौकशीनंतर सत्य बाहेर आले आहे. आमच्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही,” असे धस यांनी सभागृहात ठामपणे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराबद्दल त्यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. मदत मास–खिदमत मास जमिनींच्या मुक्ततेनंतर मराठवाड्यातील नागरिकांवरील अनेक वर्षांचे बंधन दूर होऊन विकासाचा मार्ग अधिक वेगाने खुला होईल असा विश्वास आमदार धस यांनी व्यक्त केला.
---
कोणीही उठून लोकप्रतिनिधींवर आरोप करणे चुकीचे
----आमदार सुरेश धस
मदत मा,खिदमत मास जमिनींच्या मुद्यावर बोलताना आमदार सुरेश धस यांनी विरोधकांवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले,कोणीही उठलं आणि लोकप्रतिनिधीवर आरोप करायला सुरुवात केली.भांडण एकाचं आणि आरोप दुसऱ्यावर! घटनेला पंधरा दिवस झाले,एकही पुरावा मिळालेला नाही.मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.ते पुढे म्हणाले,उठसूट सोशल मीडियाचा वापर करून लोकप्रतिनिधीची बदनामी करणे चुकीचे आहे.


stay connected