कड्याच्या बंधाऱ्याकडे कोणी लक्ष देणार का ? तीन महिन्यांपासून बंधाऱ्यावरची वाट चालू केली नाही

 कड्याच्या बंधाऱ्याकडे कोणी लक्ष देणार  का ?
तीन महिन्यांपासून बंधाऱ्यावरची वाट चालू केली नाही 




कडा (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील कडा येथील कोल्हापूरी बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.कारण कडि नदीला १५ सप्टेंबर रोजी महापूर आला होता आणि या बंधाऱ्याचे दरवाजे जास्त प्रमाणात बंद ठेवल्याने या बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बंधाऱ्यांकडे कायमच संबंधित कार्यालय,अधिकारी यांचे दुर्लक्ष राहीले आहे. याआधी हि मोठ्या प्रमाणात दरवाज्यातून पाणी गळती होत होती. संबंधितांना लेखी तक्रार केली होती तसेच वारंवार विनंती केली परंतु आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत. फक्त एकवेळ तात्पुरते पाणी गळती थांबविण्यासाठी थातुरमातुर काम संबंधित अधिकाऱ्यांनी करून दिले होते. त्यानंतर आजपर्यंत कसलीच कामे किंवा कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत. नदिला महापूर येऊन बंधाऱ्याची तुटफुट होऊन तीन महिने होत आलेत तरीही आजपर्यंत बंधाऱ्यावरील वाट सुध्दा चालू केली नाही. तर दुरूस्तीचे काम कधी करतील ? हि वाट बंद असल्याने शेतकऱ्या सह नागरीकांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व सुंदरनगर (झोपडपट्टी)कडील नागरीकांना ये-जा करण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत आहे. तीन महिने झाले वाट बंद असून अधिकारी पाहणीसुध्दा करत नाहीत अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली. हा बंधारा खराब अवस्थेत असल्याने प्रत्येक दरवाज्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते त्यामुळे पाणी साठून राहत नाही. आणि वाट हि बंद असल्याने या बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करून वाट सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. संबंधितांकडून आजपर्यंत कसलीच दखल घेतली नसल्याने नागरिकांनी हा बंधारा लवकरात लवकर दुरूस्तीचे काम सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.