साबलखेड ते आष्टी रस्त्याचे काम कधीमधी, कडा येथे रस्त्याला आले गटारीचे स्वरूप, काम कधी पूर्ण होणार ?
कडा ( वार्ताहर) :- गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू होते आणि आता तर कधीमधीच काम केले जात आहे त्यामुळे प्रवासी आणि कडा येथील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. कडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात, इंडिया बँकेसमोरील काही दुकानासमोर तर रस्ता उकरुन ठेवला आहे. त्यात पाणी साचले आहे आणि त्या पाण्यात अक्षरशः डुकरं लोळत आहेत त्यामुळे पाच दहा फुटांवर असलेल्या व्यावसायिकांना रोगराईची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साबलखेड ते आष्टी या सिमेंट रस्त्याचे काम जवळजवळ अडीच वर्षांपूर्वी सुरू झाले होते, ते काम पूर्ण करण्याचा कालावधी कधी संपून गेला आहे. अतिशय संथ गतीने आणि नागरिकांना त्रस्त करीत हे काम कसेबसे सुरू आहे अनेक ठिकाणी अपूर्ण राहिले आहे त्यामुळे नागरिक, प्रवासी त्रस्त झाले आहेत. ठेकेदार आणि अधिकारी यांचे याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. अद्याप कासारी येथे पुलाचे काम बाकी आहे तसेच ज्या ठिकाणी पूल झाले आहे त्या ठिकाणी थोडे थोडे काम अपूर्ण राहिले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पुलावर खटक्या सोडल्या आहेत त्यामुळे दुचाकीस्वरांच्या गाड्या त्या ठिकाणी जोरात आढळत आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, तेही दुरुस्त करणे गरजेचे आहे परंतु अधिकारी आणि ठेकेदार याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. कासवतीने चाललेले काम आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शेरी बुद्रुक येथील कच्चा पूल पावसाळ्यात तीन वेळेस वाहून गेला होता, तसेच कडा येथील व्यवसायिकांनी या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी आंदोलन देखील केले होते. असा हा वादग्रस्त ठरलेला रस्ता कधी पूर्ण होतो याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
सुरुवातीपासूनच साबलखेड ते आष्टी या रस्त्याचे काम वादग्रस्त ठरले आहे कडा येथील महेशनगर येथील शेतकऱ्यांनी मावेजा मिळावा म्हणून आंदोलनाची हाक दिली होती, त्यांच्यावर संबंधित अधिकाऱ्याने केसेस केल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच साबलखेड ते आष्टी या रस्त्यावरील व्यावसायिक, रस्त्याच्या कडेला राहणारे शेतकरी व नागरिक यांना अतिशय त्रास सहन करावा लागला आहे आता तरी हे उर्वरित काम लवकर होते की आणखी वर्षभर लागते याकडे सर्वसामान्य लक्ष लागले आहे.


stay connected