पैलवान सिकंदर शेख चांगला खेळाडू; त्याच्यावरील अन्याय दूर करा!
---------------------------------
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,
क्रीडा मंत्र्यांकडे माजी आ.भीमराव धोंडे यांची मागणी
-----------------------------------
आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आणि क्रीडा क्षेत्रातील गुणी पैलवान सिकंदर शेख याला पंजाब राज्यामध्ये कुटील डाव करून जाणीवपूर्वक अडकवले असून त्याच्यावरील हा झालेला अन्याय दूर करून यातून त्याची मुक्तता करावी व न्याय द्यावा अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. माध्यमांशी बोलताना माजी आ. भीमराव धोंडे म्हणाले की, सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील अत्यंत गुणवंत पैलवान आहे. खऱ्या अर्थाने त्याच्यावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे. पंजाब राज्यात कुस्तीच्या सरावासाठी तो गेलेला होता.. परंतु तेथे काही लोकांनी कटकारस्थान करून त्याच्यावर गंडांतर आणलेले दिसते. अधिक माहिती नाही; परंतु एवढे मात्र नक्की की सिकंदर शेख स्वभावाने चांगला आहे. गरिबीत वाढलेला आहे.. वडिलांनी अक्षरशः हमाली करून त्याला पैलवानकीचे शिक्षण देण्यासाठी मोठे योगदान दिलेले आहे.एवढ्या कष्टातून पुढे आलेला सिकंदर शेख हा अशा प्रकारची शस्त्रास्त्रांची तष्करी करेल असे वाटत नाही. त्या राज्यातील अनेक मुलांना सिकंदरने मैदानात हरवलेले आहे, ही वास्तव स्थिती आहे.त्यामुळे तेथील काही लोकांनी कटकारस्थान करून त्याला गुंतवलेले दिसते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, क्रीडामंत्री यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून सिकंदर शेख याला न्याय द्यावा, अशी मागणी माजी आ. भीमराव धोंडे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना येथे दिली.


stay connected