सीना नदीवरील खडकत-१ बंधाऱ्याचे पुनर्निर्माण पूर्ण
*****************************
नाम फाउंडेशन व आ.सुरेश धस यांच्या पुढाकाराने जलसाठ्याला नवा श्वास…!
*******************************
आष्टी (प्रतिनिधी):
अतिवृष्टीच्या तडाख्यात सीना नदीने कहर केला आणि नदीपात्रातील पाच बंधारे वाहून गेले. त्यात खडकत-१ व सांगवी संगमेश्वर (ता. आष्टी, जि. बीड) येथील बंधाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या बंधाऱ्यांवर अवलंबून असलेली सुमारे ८ ते १० हजार हेक्टर बागायती शेती पाण्याअभावी धोक्यात आली होती.
महापुरानंतरची स्थिती पाहण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. यावेळी आ. सुरेश धस यांनी सांगितले की जर हे बंधारे तातडीने दुरुस्त केले नाहीत तर आष्टी तालुका पुन्हा दुष्काळग्रस्त होईल.
या गंभीर परिस्थितीची जाणीव होताच आमदार धस यांनी नाम फाउंडेशनशी संपर्क साधून मदतीचे आवाहन केले. तत्परतेने प्रतिसाद देत फाउंडेशनने २० ऑक्टोबर रोजी कामास प्रारंभ केला.केवळ १० ते १५ दिवसांच्या कालावधीत, नाम फाउंडेशन, महाराष्ट्र शासन आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे काम पूर्णत्वास आले आहे.
दिवाळीचा सण असतानाही आणि रात्री उशिरापर्यंत सर्व मशीन ऑपरेटर व कामगारांनी न थकता परिश्रम घेतले, हा खऱ्या अर्थाने सेवा आणि बांधिलकीचा आदर्श ठरला आहे.या कामात आ. सुरेश धस यांचे नेतृत्व, महसूल विभागातील आष्टीचे तहसीलदार वैशाली पाटील व कर्जत तहसीलदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या बंधाऱ्याच्या पुनर्निर्माणामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना आता येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची भीती नाही. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान आणि आशेचे हास्य फुलले असल्याने नाम फाउंडेशन व आ.सुरेश धस यांचे आभार मानले जात आहेत.


stay connected