हिवरा-पिंपरखेड परिसरात बिबट्याचा वावर — वनविभागाकडून जनजागृती मोहीम
आष्टी तालुक्यातील मौजे हिवरा पिंपरखेड, डोंगरगण, दादेगाव, देवीनिमगाव, लिंबोडी आणि शिरापूर या गावांच्या परिसरात सध्या बिबट या वन्यप्राण्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता, आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमोल मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने या सर्व गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान वनविभागाच्या टीमने संबंधित गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांची भेट घेऊन बिबट्यापासून संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना आणि काळजीविषयी माहिती दिली. नागरिकांना शेतीची कामे करताना सावधानता बाळगण्याचे, विशेषतः सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा शेतात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले.
वनविभागाकडून जनतेस खालील सूचना देण्यात आल्या आहेत —
शेतात काम करताना गटाने जाणे.
लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना एकटे बाहेर न सोडणे.
शेतामध्ये प्रकाशाची व्यवस्था ठेवणे.
बिबट्याच्या हालचालीबाबत कोणतीही माहिती आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवणे.
या जनजागृती उपक्रमात वनरक्षक विधाते मॅडम तसेच त्यांच्या पथकातील पाथरकर, शेख आणि पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी ग्रामस्थांना बिबट्याच्या सवयी, हालचाली, आणि सुरक्षित राहण्यासाठीच्या पद्धतींबद्दल मार्गदर्शन केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंढे यांनी सांगितले की, “वन्यप्राणी आपल्या परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांना इजा पोहोचवू नये, तसेच स्वतःची सुरक्षितता देखील राखावी. वनविभाग नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्ण दक्ष आहे.”
सध्या या परिसरात बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. वनविभागाच्या टीमकडून परिसरात नियमित गस्तही वाढवण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, वनविभागाच्या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.








stay connected