आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय दोन किमी रस्त्यावर तब्बल १५०० खड्डे , रस्त्याची लागली वाट !
आष्टी प्रतिनिधी - आष्टी शहर ते शिदेवाडी फाटा या दोन किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल दीड हजार खड्डे पडल्याने प्रवाशांचा जीव मुठीत आला आहे. खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून वाहनधारक व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावरून तब्बल पन्नास गावांतील वाहनधारकांना दैनंदिन प्रवास करावा लागतो. शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, कामगार व नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्यावरच शासकीय आयटीआय महाविद्यालय तसेच एमआयडीसी परिसर आहे. दरवर्षी निवडणुकी दरम्यान याच शासकीय आयटीआय मध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडते. तरीसुद्धा या महत्त्वाच्या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना तोल जाऊन अपघात होत आहेत, तर चारचाकी वाहनधारकांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा स्थानिकांनी प्रशासनाकडे तक्रारी नोंदवूनही अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेतलेले नाही.
‘खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरावा लागतो. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता दुरुस्त न केल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,’ असा इशारा स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी दिला आहे.
stay connected