अंभोरा पोलिसांची बारा जुगारीवर कारवाई
-----------------
दुचाकी, मोबाईलसह आठ लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त
--------------------
कडा / वार्ताहर
-----------------
तालुक्यातील धामणगाव परिसरातील एका शेतात तिरट नावाचा जुगार पैसे लावून खेळणाऱ्या जुगारीच्या अड्ड्यावर छापा मारून अंभोरा पोलिसांकडून दुचाकी, मोबाईलसह आठ लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करून बारा आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी ठाण्यांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहवी, या हेतूने अवैद्य धंद्याच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे मलईदार अवैद्य धंद्यावाल्यांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. अंभोरा पोलिसांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील धामणगाव परिसरात एका शेतामध्ये जुगारीचा अड्डा चालू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे शेतातील जुगार अड्ड्यावर छापा मारून पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या बारा आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करून दुचाकी, मोबाईलसह इतर साहित्य असा आठ लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करून अंभोरा पोलीसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण हानपूडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मंगेश साळवे यांच्या टीम कडून कारवाई करण्यात आली. पुढील तपास अंभोरा पोलीस करीत आहेत.
---------%%-----------
stay connected