स्वातंत्र्यदिनानिमित्त अहिल्यानगरहून पंढरपूरपर्यंत ४०० कि.मी.ची तिरंगा सायकल रॅली
"देशप्रेमाची अनोखी वाटचाल – ३५ तासांत अहिल्यानगर ते पंढरपूर तिरंगा सायकल प्रवास"
अहिल्यानगर, दि. १६ (प्रतिनिधी):
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उत्सवानिमित्त संपूर्ण देशभर तिरंगा फडकवून, रॅली काढून देशप्रेम जागृत करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचाच भाग म्हणून अहिल्यानगर येथील तीन समाजप्रेमी नागरिकांनी तिरंगा ध्वज सायकलींना लावून अहिल्यानगर ते पंढरपूर असा ४०० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ३५ तासांत पूर्ण करून अनोखा संदेश दिला.
या तिरंगा सायकल रॅलीत सहभागी झालेले तिघे – जनार्धन दाजीबा गीते (वय ५८, सेवानिवृत्त कर्मचारी, कायनेटिक कंपनी), प्रा. डॉ. रामकृष्ण गहिनीनाथ बोडखे (वय ५५, इतिहास विभाग प्रमुख, आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय, कडा, जि. बीड) आणि मेजर रावसाहेब लक्ष्मण कातोरे (वय ५०, सेवेनंतरही आर्मीमध्ये कार्यरत) यांनी हा प्रेरणादायी उपक्रम राबविला.
१४ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजता अहिल्यानगर येथून सायकल प्रवासाची सुरुवात झाली. मिरजगाव, करमाळा मार्गे कुरकुम होत पंढरपूर येथे पोहोचून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन दुपारी परतीचा प्रवास सुरू केला. अवघ्या एका दिवसात तब्बल २५० किलोमीटरचे अंतर पूर्ण करून पावसामुळे कुरकुमजवळ मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ५.३० वाजता प्रवास सुरू करून दुपारी ३ वाजता पुन्हा अहिल्यानगर येथे पोहोचले.
या रॅलीतून तिघांनी समाजाला स्पष्ट संदेश दिला की – सायकल चालवणे केवळ देशप्रेमाची जाणीव करून देत नाही तर आरोग्य सुधारते, प्रवासाचा खर्च कमी होतो आणि पर्यावरण प्रदूषणावर नियंत्रण मिळते. जगभरातील प्रगत देशांत सायकल वापराचे प्रमाण मोठे असून भारतातही सर्वांनी यापासून प्रेरणा घ्यावी असे त्यांनी आवाहन केले.
अशा प्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या तिघांनी देशप्रेमाचा
संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला.



stay connected