यंदा गणेशोत्सव 'डीजेमुक्तच', मिरवणूक शिस्तीत काढा
-----------------------
पोनि शरद भुतेकर, कड्यात शांतता समितीची बैठक
----------------------
राजेंद्र जैन / कडा
----------------
आगामी कालावधीत येणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण गणेश भक्तांसह नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था, तसेच सामाजिक शांतता, सलोखा कायम ठेवून डीजेमुक्त गणेश उत्सव साजरा करावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी केले.
कडा येथील पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात शनिवारी सकाळी पोलिसांकडून शांतता बैठक आयोजित करण्यात आली होती. पोनि भुतेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरून बोलत होते. सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवडे, सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, नामदेव धनवडे यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना भुतेकर म्हणाले की, गणेशोत्सव साजरा करताना गणेश भक्तांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या नियमावलीचे तंतोतंत पालन करावे. यंदा मिरवणुकी दरम्यान डीजेला किंवा बँजोला पूर्ण बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट करून मिरवणुकीत पारंपारिक वाद्य वापरून न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण नियंत्रण आदेशाची अंमलबजावणी करावी. तसेच लेझर लाईटच्या वापरावरही कडक बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सव हा सामाजिक एकोप्याचा आणि श्रद्धेचा सण असून, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळ परस्पर समन्वयाने हा उत्सव सुरळीत पार पाडावा. या पार्श्वभूमीवर शांतता, सलोखा व कायदा सुव्यवस्थेची योग्य अंमलबजावणी व्हावी. गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण एकात्मतेने जबाबदार नागरिक म्हणून साजरे करावेत. तसेच कोणतीही अनपेक्षित घटना घडल्यास त्वरित पोलिसांना संपर्क करावा. असे आवाहन भुतेकर यांनी केले. शांतता बैठकीला कडा परिसरातील पत्रकार, प्रतिष्ठित नागरिकांसह गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांचे आभार सपोनि विजय नरवडे यांनी मानले.
-------%%------
stay connected