डोळे उघडे असलेली न्यायदेवता
(बी.ए. एल.एल.बी. – तृतीय वर्ष)
परिचय:
शतकानुशतके न्यायदेवतेची डोळ्यांवर पट्टी बांधलेली मूर्ती, एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार धरलेली, ही न्यायाची पारंपरिक प्रतिमा राहिली आहे. परंतु आता ही प्रतिमा इतिहासजमा होत आहे. वसाहतकालीन छायेतून बाहेर पडत भारताने स्वतःच्या सांस्कृतिक प्रतीकांचे आलिंगन घेतले आहे. नवी ‘न्यायदेवी’ साडी परिधान केलेली, डोळे पूर्णपणे उघडे ठेवून उभी आहे. एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात भारतीय राज्यघटना आहे. भारताचे मुख्य न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी नुकतीच ही मूर्ती सर्वोच्च न्यायालयात अनावरण केली.
"कायदा आंधळा आहे" ही पाश्चात्त्य प्रतिमा अनेक पिढ्यांपासून रूजलेली आहे. ही धारणा बदलण्यासाठी वेळ आणि जनजागृती लागेल. पश्चिमी वस्त्रप्रावरणाऐवजी साडी आणि भारतीय अलंकारांनी सजलेली ही मूर्ती वसाहतकालीन प्रभावांपासून मुक्ततेचे प्रतीक मानली जात आहे.
ही बदलाची दुसरी पायरी आहे, नुकतेच भारतीय दंड संहिता, दंड प्रक्रिया संहिता आणि पुरावा कायदा यांची जागा अनुक्रमे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम यांनी घेतली आहे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जगातील सर्वात प्राचीन आहेत. त्यामुळे हा बदल फक्त इतिहासाला सलाम नाही, तर आपली ओळख आणि मूल्यांचे पुनर्स्थापन आहे.
द्रुत दृष्टीक्षेप:
न्यायदेवतेची संकल्पना रोमन पौराणिक कथांतील जस्टिटिया या देवीतून आली आहे. मूळ प्रतिमेत तलवार, तराजू आणि डोळ्यांवरील काळी पट्टी होती. पुनर्जागरण काळात (१४वे शतक) ही पट्टी व्यंगात्मक स्वरूपात लावली गेली, ज्याने भ्रष्ट न्यायप्रक्रियेवर टीका केली. कालांतराने ही पट्टी निष्पक्षतेचे प्रतीक मानली जाऊ लागली.
भारतात ही पट्टी अनुच्छेद १४ – कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण – या संकल्पनेशी निगडित आहे. यावरूनच सामान्य माणसात "कायदा आंधळा असतो" ही संज्ञा प्रचलित झाली.
अहमदनगर येथील न्यू लॉ कॉलेजची विधी विद्यार्थिनी सय्यद फिजा सिद्दिक सय्यद सांगते की, पारंपरिक न्यायदेवता पाश्चात्त्य पोशाखात, तलवार व तराजू हातात घेतलेली असते, जी न्याय व शक्तीचे प्रतीक आहे. पण नव्या प्रतिमेत साडीतील न्यायदेवता तलवारीऐवजी भारतीय राज्यघटना धरते, जी भारतीय सांस्कृतिक ओळखीशी घट्ट जोडली गेलेली आहे व न्यायव्यवस्थेत संविधान सर्वोच्च असल्याचे अधोरेखित करते.
नवीन दिशा:
डोळ्यांवरील पट्टी काढून टाकून उभी केलेली नवी न्यायदेवता भारतीय न्यायव्यवस्थेला नवी वाट दाखवते. ही प्रतिमा अधिक संवेदनशील, समावेशक आणि जनकेंद्री न्यायव्यवस्था दर्शवते. पारंपरिक आंधळेपणाऐवजी सजग, जागरूक आणि संविधानमूल्यांवर आधारित न्यायाचे हे प्रतीक आहे.
आंधळा कायदा:
"कायदा आंधळा असतो" ही म्हण आता नव्या दृष्टीकोनातून पाहावी लागेल. तलवारीऐवजी राज्यघटनेचे पुस्तक ही शक्तीपेक्षा ज्ञानाचे वर्चस्व दर्शवते. ही नवी प्रतिमा सामाजिक असमानता ओळखून, तरीही संविधानिक मूल्ये जपणाऱ्या न्यायाची जाणीव करून देते.
निष्कर्ष:
साडीतील आणि राज्यघटनेला हातात धारण केलेली न्यायदेवता ही भारताच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. ती संविधानिक सर्वोच्चत्वाचे अधोरेखन करते आणि वसाहतकालीन प्रतीकांपासून मुक्ततेची जाणीव करून देते.


stay connected